हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर (Chris Rock) अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली होती. त्यानंतर विल स्मिथवर ऑस्करने कडक कारवाई केली आहे. विल स्मिथवर आता ऑस्करने १० वर्षांची बंदी घातली आहे.
आता पुढील १० वर्ष विल स्थिम ऑस्करच्या कोणत्याही कार्यक्रमात भाग घेऊ शकणार नाही. विलने २८ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवल्याबद्दल सुत्रसंचालक ख्रिस रॉकला कानशिलात लगावली होती. या प्रकरणाच्या ११ दिवसानंतर ऑस्करने विलवर कारवाई केली आहे आणि त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्याच्या चित्रपटही रद्द करण्यात आला आहे.
आणखी वाचा : “मी पुन्हा शेंगा विकेन पण…”, कच्चा बादाम फेम गायकाला होतोय पश्चाताप
अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि मुख्य कार्यकारी डॉन हडसन म्हणाले, “९४ व्या ऑस्करचा उद्देश गेल्या वर्षी अविश्वसनीय काम केलेल्या अनेक लोकांचा उत्सव साजरा करणं हा होता. मात्र या सगळ्यात विल स्मिथच्या अशा वागण्याने हे सगळं विस्कळीत झालं.”
विल स्मिथने ऑस्करचा निर्णय केला मान्य
विल स्मिथने अकादमीचे हा निर्णय मान्य केला आहे. मी अकादमीच्या निर्णयाचा स्वीकार करतो आणि त्याचा आदर करतो, असे तो म्हणाला.
‘किंग रिचर्ड’साठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्यानंतर त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा विल स्टेजवर पोहोचला तेव्हा त्याने आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल माफी मागितली. तर दुसऱ्या दिवशी विलने यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली होती.