सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ऑस्करच्या मंचावर जे काही झाले ते कोणालाही अपेक्षित नव्हते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत क्रिस रॉक हा विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवत असल्याचे दिसते. दरम्यान, विल स्मिथ स्टेवर गेला आणि त्याने क्रिसला कानशिलात लगावली. त्यानंतर तो त्याच्या जागेवर येऊन म्हणाला, “माझ्या पत्नीचे नाव पुन्हा तुझ्या तोंडातून घेऊ नकोस.” यावर उत्तर देत क्रिस म्हणाला, “तो अस करणार नाही.”
आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ट्विटवर नेटकऱ्यांनी या सगळ्यावर चर्चा सुरु केली आहे. तेव्हापासून ट्विटरवर #Unacceptable, #Apologize, #Oscars हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. यावर एक नेटकरी म्हणाला, “हे भांडण नक्की स्क्रिप्टेडं होतं की खरचं झालं.”
आणखी वाचा : “…तर सर्वांसमोर ऑस्करची ट्रॉफी वितळवून टाकेन”, झेलेन्स्कीं प्रकरणावरून अभिनेत्याची धमकी
विल स्मिथला यावर्षी ‘किंग रिचर्ड’साठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची कथा टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स यांचे वडील रिचर्ड विल्यम्स यांच्या कथेवर आधारित आहे. मात्र, कनशिलात लगावल्याच्या व्हिडीओमुळे विल स्मिथ चर्चेत आहे.