देशभरात सध्या सुरु असलेल्या #metoo या मोहिमेच्या माध्यमातून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर आता ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावरही निष्ठा जैन या महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याविषयी विनोद दुआ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून त्यांची मुलगी मल्लिका दुआने मात्र तिचं मत व्यक्त केलं आहे.
निष्ठा जैन एक मुक्त पत्रकार असून २९ वर्षापूर्वी विनोद दुआ यांनी लैंगिक अत्याचारासोबतच मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून निष्ठाने विनोद दुआ यांच्यावर आरोप करत संपूर्ण घटना मांडली आहे. यावर आता विनोद दुआ यांच्या मुलीने म्हणजेच मल्लिकाने ट्विटरच्या माध्यमातून तिचं मत मांडलं आहे.
— Mallika Dua (@MallikaDua) October 14, 2018
‘निष्ठा जैनने माझ्या वडीलांवर केलेले आरोप हे खरंच फार धक्कादायक आहेत. माझा माझ्या वडीलांवर पूर्ण विश्वास आहे. परंतु जर त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खरे ठरले तर ते माझ्यासाठी फार अनपेक्षित असेल. मला या गोष्टीचा प्रचंड त्रास होईल’, असं मल्लिका म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘माझ्या वडीलांवर आरोप करण्यासोबतच निष्ठा यांनी माझ्या नावाचाही उल्लेख केला. हे खरंतर फार चुकीचं आहे. ही लढाई माझ्या वडीलांची आहे. त्यामुळे ते त्यांच्या परीने उत्तर देतीलच. मी केवळ त्यांच्यासोबत ठामपणे उभी आहे’.
दरम्यान, निष्ठा जैनने केलेल्या विनोद दुआ यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. निष्ठा जैन एक मुक्त पत्रकार असून त्यांनी दिल्लीतील जामिया मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर येथून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. या व्यतिरिक्त त्यांनी फिल्म अँण्ड टेलीव्हिजन इन्स्टीट्युट येथून पुढील शिक्षण केलं आहे. तर विनोद दुआ हे पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक नामांकित चॅनेलमध्ये काम केलं आहे. त्यासोबत सूत्रसंचालक,पॉलिटिकल कमेंटेटर, निवडणूक विश्लेषक या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे २००८ मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.