झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. लोकप्रियतेच्या बाबतीत या मालिकेने उच्चांक गाठले. आता या मालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मालिकेचा शंभरावा भाग आज (बुधवार, ५ डिसेंबर) प्रदर्शित होणार आहे. मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे याने यानिमित्ताने एक ट्विट केले आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये चक्क इराकमधील एका महिला प्रेक्षकाने शंभराव्या भागासाठी विक्रम सरंजामे म्हणजे सुबोध आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुबोध आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातारची प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं सांगणारी ही मालिका आज अनेक मराठी घरांमध्ये पाहिली जाते. मात्र ही मालिका केवळ देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय असल्याचे सुबोधने केलेल्या ट्विटमधून दिसून येत आहे. “आज शंभरावा भाग प्रदर्शित होणार आहे आणि त्यानिमित्त थेट इराकवरून शुभेच्छा आल्या आहेत,” असं सुबोध आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे. या ट्विटबरोबर त्याने एका इराकी महिलेचा १३ सेकंदांचा व्हिडीओही शेअर केला आहे. “आज ‘तुला पाहते रे’ चा शंभरावा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे विक्रांत सरंजामे आणि इशाला तसेच संपूर्ण टीमला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम,” अशा शब्दांमध्ये या महिलेने मालिकेच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
And it’s 100 th episode Today#tulapahatere
And good wishes came directly from Iraq
Thank you @kristy_wilson1
It’s gr8 to see people outside India also love to watch Marathi serials.
Love and Namaskar to all Iraqi people.@zeemarathi pic.twitter.com/JRzCIEQm3n— Subodh Bhave (@subodhbhave) December 5, 2018
मराठी भाषेतील मालिकेला इराकसारख्या देशात मिळाणे प्रेम पाहून सुबोधलाही आनंद झाला. या शुभेच्छांना सुबोधने त्याच ट्विटमध्ये उत्तर दिले आहे. सुबोध म्हणतो, ‘भारताबाहेरील लोकांनाही मराठी मालिका पाहायला आवडते याचा विशेष आनंद आहे. सर्व इराकी लोकांना नमस्कार आणि खूप सारे प्रेम.’ सुबोधला मराठी मालिका परदेशात पाहिल्या जात असल्याचा विशेष आनंद झाल्याचे त्याच्या ट्विटमधूनच दिसून येते. याआधीही त्याने मराठी भाषेतील सिनेमांसंदर्भात अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कलर्स मराठी वहिनीवरील कार्यक्रमातील दिवाळी विशेष भागामध्ये आपले मत व्यक्त केले होते. मराठी कलाकारांच्या पाठीशी आपणच उभे राहिले पाहिजे असे त्याने यावेळेस बोलताना सांगितले होते.