चित्रपट म्हटलं की कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, क्रू मेंबर्स, लोकेशन अशा अनेक गोष्टी गरजेच्या असतात. पण फक्त दोन जणांनी यापैकी कोणत्याच गोष्टींशिवाय फक्त १० लाख रुपये खर्च करून एक चित्रपट तयार केला आहे, असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे खरंय.
हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर करून तयार करण्यात आला आहे. बंगळुरूजवळच्या सिद्धेहल्ली गावातील पूजारी नरसिम्हा मूर्ती यांच्यासाठी हा चित्रपट एक स्वप्न होतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नूतन नावाच्या एआय एक्सपर्टची मदत घेतली. नूतन आधी ग्राफिक डिझायनर होते. ९५ मिनिटांच्या या कन्नड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून U/A सर्टिफिकेट दिलं आहे.
फक्त १० लाखांच्या बजेटमध्ये तयार झाला चित्रपट
‘लव्ह यू’ हा चित्रपट फक्त दोन जणांच्या टीमने केला आहे. नरसिम्हा मूर्ती व नूतन अशी त्यांची नावं आहे. त्यांनी एआयच्या मदतीने कलाकार तयार केले, साउंडट्रॅक बनवले व व्हिज्युअल क्रिएट केले. यानंतर त्यांनी ३० वेगवेगळे टूल्स वापरले. या चित्रपटासाठी १० लाख रुपयांचा खर्च आला. त्यापैकी जास्तीत जास्त पैसे एआय सॉफ्टवेअर लायसेन्सिंगवर खर्च केले आहेत.
‘लव्ह यू’ मध्ये आहेत १२ गाणी
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना नरसिम्हा मूर्ती यांनी सांगितलं की त्यांना जगातील पहिला एआय फीचर चित्रपट बनवायचा होता आणि तो सिनेमागृहांमध्ये रिलीज करायचा होता. एक रेकॉर्ड बनवण्यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करायचा आहे, अशी त्यांची इच्छा आहे. ९५ मिनिटांच्या या कन्नड चित्रपटात १२ गाणी आहेत आणि एआयने तयार केलेले संवाद आहेत. पण यासाठी मूर्ती यांनीही मेहनत घेतली आहे.
२०२४ मध्ये बनलाय पहिला एआय फीचर फिल्म
‘लव्ह यू’ हा जगातला पहिला एआय जनरेटेड चित्रपट नाही. २०२४ मध्ये ‘व्हेयर द रोबोट्स ग्रो’ नावाचा चित्रपट आला होता, जो पहिला एआय जनरेटेड चित्रपट आहे. नरसिम्हा यांनी सेन्सॉर बोर्डाची प्रतिक्रिया सांगितली. “रिजनल सेन्सॉर ऑफिसर्सनी सीनमधील पात्रांच्या सिंकिंग समस्येकडे लक्ष वेधले होते. कारण या पात्रांवर भावनिक सीन बनवणं तसेच लिप-सिंकिंग करणंही आव्हानात्मक होतं. पण सेन्सॉर बोर्डाने आमची महत्वाकांक्षा व इनोव्हेशनचं कौतुक केलं,” असं नरसिम्हा म्हणाले.
नूतन म्हणाले, “आम्ही वापरलेले एआय टूल्स ६ महिने जुने आहेत. आता जर हा चित्रपट बनवायचा असेल तर तो हजार पट जास्त चांगला बनू शकेल.”