रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने ३५० कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातला तिचा हा चौथा चित्रपट आहे. तिने २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या वर्षी तिच्या चित्रपटसृष्टीमधल्या कारकीर्दीला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षांमध्ये आलियाने बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच प्रियदर्शनी अकादमीने ‘स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ देऊन तिचा सन्मान केला. योगायोग म्हणजे आज तिच्या वडिलांचा, महेश भट्ट यांचा वाढदिवस आहे.
या पुरस्कारासह मिळालेल्या सन्मानपत्रकाचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने महेश भट्ट यांनी खूप आधी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे असे म्हटले जात आहे. २०१६ मध्ये महेश भट्ट स्मिता पाटील फिल्म फेस्टिवलला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी ‘आलिया स्मिता पाटील यांच्यासारखी अभिनेत्री होऊ शकते’ असे भाकित केले होते. तिने लहान वयात व्यावसायिक आणि समातंर अशा दोन्ही पद्धतीचे चित्रपट केले आहेत असे म्हणत त्यांनी आलियाच्या कामाची स्तृतीदेखील केली होती.
पीटीकेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते, “मी सिनेसृष्टीमध्ये नव्या दमाचे चेहरे पाहत आहे. यात आलियाचाही समावेश आहे. स्मिता पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून ती चालते आहे. ती व्यावसायिक आणि समातंर अशा दोन्ही पद्धतीच्या चित्रपटांमध्ये काम करु शकते. मी आलियाचे नाव का घेऊ नये? तिने लहान वयातच हायवेसारख्या चित्रपटामध्ये काम करतानाच अनेक सुपरहिट चित्रपटही केले आहेत. लहानपणापासून आलिया स्मिता पाटील यांचे चित्रपट पाहते आहे. तिच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचे सर्व गुण आहेत”
आलियाला मिळालेल्या यशावरुन तिने महेश भट्ट यांची भविष्यवाणी खरी ठरवली आहे असे लक्षात येते. या पुरस्काराद्वारे आलियाने त्यांना खास गिफ्ट दिले आहे.