‘एक होता राजा, त्याने राजकन्येला वाचवलं आणि दोघं सुखाने नांदू लागले,’ लहानपणी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींचा नायक नेहमीच एखादा राजकुमार किंवा राजाच असायचा. अगदी डिस्ने प्रिन्सेसच्या गोष्टींमध्येसुद्धा राजकन्येला संकटातून सोडवायला राजकुमार आल्याशिवाय गोष्ट संपायची नाही. चित्रपटाचे माध्यम आले आणि या कथा पडद्यावर साकारल्या जाऊ लागल्या. त्यातही पुरुषच नायक असल्यामुळे राज्यकारभार करण्यापासून ते युद्धात लढण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत तोच पुढे दिसायचा. इतिहासाची पाने तपासल्यावर आपल्याला जाणवणारी मुख्य बाब म्हणजे, जितक्या सहजतेने आपण लढवय्या पुरुषांची नावे सांगू शकतो, तितक्या सहजतेने नायिकांची नावे सांगणे कठीण होते. कित्येक राजांच्या पराक्रमामागे त्यांच्या राण्या मूक सूत्रधार होत्या. पण त्यांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. पण इतिहासाच्या पानामधील दडलेल्या नायिकांना लोकांसमोर आणण्याचे काम टीव्ही करताना दिसत आहे. सध्या टीव्हीवर पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांचं चांगलंच पेव फुटलेलं आहे. मात्र, अशा मालिकांच्या गर्दीत प्रकर्षांने जाणवणारी बाब म्हणजे मालिका पुरुष पात्रावर आधारित असूनही कथानकामध्ये जास्त भर स्त्री पात्रांवर दिला जातोय. टीव्हीवर असलेला बहुतांश स्त्री प्रेक्षकवर्ग, स्त्री पात्रांकडून मिळणारी प्रेरणा, या पात्रांविषयी वाटणारी आत्मीयता अशी विविध कारणे हा ट्रेंड रुजू होण्यामध्ये दिसून येतात.
खंडोबांच्या जीवनावर आधारित ‘जय मल्हार’ मालिकेत खंडोबापेक्षा म्हाळसा आणि बानूची त्यांच्यावरची भक्ती यावर जास्त भर दिला गेला आहे. आताही खंडोबांच्या गैरहजेरीत म्हाळसा एका उत्तम प्रशासकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. तर दुसरीकडे ‘तू माझा सांगाती’ मालिकेत संत तुकारामांची बायको आवलीच्या जीवनावर भर दिला आहे. संसार ते संत बनण्याच्या तुकारामांच्या प्रवासात आवलीची झालेली फरफट, त्यातही तिने संसार आणि आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी केलेले प्रयत्न हे मालिकेचे कथानक आहे. हिंदीमध्येही कमी-अधिक फरकाने हेच चित्र आहे. ‘धरती का वीर योद्धा महाराणा प्रताप’ या मालिकेमध्ये राजस्थानचा योद्धा महाराणा प्रतापची कथा असूनही सुरुवातीपासून त्याचं आयुष्य घडवण्यासाठी जबाबदार असलेल्या त्याच्या दोन आई जयवंताबाई आणि धीरबाई यांच्यातील असूया आणि आपापल्या मुलाला सिंहासनावर बसविण्यासाठी चाललेल्या स्पर्धेवर कथानकामध्ये भर दिला होता. त्यानंतरही फुलकँवर आणि अजबदे यांच्यातील मैत्री, प्रताप यांची पत्नी बनण्यासाठी दोघींमध्ये असलेली चुरस याभोवती मालिका फिरत होती. सध्या महाराणा प्रताप यांची पत्नी अजबदे आणि सावत्र आई धीरबाईतील द्वंद्वावर भर दिला आहे. ‘जोधा अकबर’ मालिकेतही सम्राट अकबर आणि राणी जोधा यांची प्रेमकथा हे मालिकेचे मूळ कथानक असूनही सुरुवातीपासून जोधाचा बाणेदारपणा, रुकय्या बेगमशी तिची स्पर्धा आणि हिंदू घरातून येऊनही मुघलांमध्ये स्वत:चं अस्तित्व टिकविण्याची धडपड यावर मालिकेमध्ये भर होता. सध्याही जोधाचा मुलगा सलीमसाठी दोघींची चुरस हा मालिकेचा मुख्य विषय आहे. ‘सिंहासन बत्तीशी’मध्येही राजा विक्रमादित्यच्या सिंहासनावरील बत्तीस पऱ्यांच्या कथांमधून मिळणारी शिकवण हा मुख्य विषय आहे. ‘देवों के देव महादेव’ मध्येही महादेवाइतकेच सती, पार्वती आणि आदिमाता या रूपांवरही भर होता. लवकरच येणारी ‘रझिया सुलतान’ ही मालिका पूर्णपणे भारताची पहिली आणि एकमेव मुसलमान सम्राज्ञी बनण्याचा मान मिळविणाऱ्या रझिया सुलतानच्या जीवनावर आहे. या मालिकांमधून इतिहासातील स्त्रियांच्या जीवनावर एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इतिहासामध्ये कित्येक पुरुष पात्रांच्या इतिहासाचे संपूर्ण दाखले मिळतात. पण त्या मानाने इतिहासातील स्त्रियांविषयी जास्त बोलले जात नाही. त्यामुळे मालिकांच्या माध्यमातून अशा कर्तबगार स्त्रियांना शोधण्याचे, त्यांचे कार्य लोकांपर्यंत आणण्याचं काम केलं जात असल्याचं ‘झी टीव्ही’चे कार्यक्रम प्रमुख नमित शर्मा सांगतात. त्यासाठीच मालिकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखांवर जास्त भर दिला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतिहास काळापासून आपल्याकडे स्त्रीविषयक असलेला दृष्टिकोन काळानुसार बदलत गेलेला दिसतो. अर्थात, त्याला त्या काळातील परिस्थिती, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थाही तितकीच जबाबदार आहे. स्त्रियांकडे फक्त मनोरंजनाची गोष्ट म्हणून पाहिलं जात होतं. त्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीची मक्तेदारी मोडून काढत रझिया सुलतान बनली. त्यावेळीही स्वत:च्या नावामागे ‘सुलताना’ लावण्याऐवजी ‘सुलतान’ लावणाऱ्या स्त्रीचे पात्र पडद्यावर रेखाटणं ही आजच्या काळाची गरजच असल्याचं ‘रझिया सुलतान’ मालिकेचे लेखक सिद्धार्थ कुमार तिवारी सांगतात. आजच्या स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या तरुणींसाठी रझिया मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असल्याचा विश्वास ते व्यक्त करतात.
छोटय़ा पडद्यावरील ऐतिहासिक मालिकांचे नायक देहयष्टीमुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे लोकांच्या पसंतीस उतरतात. पण नायिकांच्या दु:खाशी मात्र प्रेक्षकही समरस होतात. बारा र्वष जेजुरी सोडून बानूकडे राहायला गेलेल्या खंडोबांची कथा सर्वानाच ठाऊक आहे. पण त्यांच्यामागे जेजुरीला एकहाती सांभाळणारी आणि तेथील जनतेवर पोटच्या मुलासारखं प्रेम करणारी म्हाळसाची दुसरी बाजू जेव्हा प्रेक्षकांसमोर येते तेव्हा प्रेक्षकांना म्हाळसा नव्याने उमजते, असं अभिनेत्री सुरभी हांडे सांगते. पुरुष आपले कौटुंबिक कलह बाजूला ठेवून सहजपणे त्याचे काम करू शकतो. पण जेव्हा स्त्री म्हणून म्हाळसा खंडोबांविषयीचा राग बाजूला ठेऊन न्यायपूर्ण राज्यकारभार पाहते तेव्हा प्रेक्षकांनाही तिचं अप्रूप वाटत असल्याचं सुरभी सांगते.
अर्थात, यामागे ‘टीव्हीवर स्त्रीप्रधान विषयांवर दिला जाणारा भर’ हेही एक कारण नाकारता येणार नाही. टीव्हीचा भारतातील मुख्य प्रेक्षकवर्ग स्त्रिया आहेत. त्यामुळे मालिकेतील स्त्री पात्राशी त्या लगेच बांधल्या जातात. त्यांना या पात्रांविषयी आत्मीयता वाटू लागते. त्यामुळे कथा जरी देवाची किंवा राजाची असली तरी त्यामध्ये स्त्री पात्रांवर भर देण्याचा चलाखपणा टीव्हीकडून केला जातो. मध्यंतरी गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेतही द्रोपदीचं स्वयंवर, तिचा पाच पुरुषांशी लग्न करण्याचा निर्णय घेताना झालेला पेचप्रसंग, वस्त्रहरण या कथानकाच्या वेळी मालिकेला जास्त टीआरपी मिळाला होता. हे लक्षात घेऊनच मालिका सुरू होण्यापूर्वीपासून जाहिरातींमध्ये पांडव, कौरव यांच्यासोबतच द्रौपदी आणि कुंतीचा खुबीने वापर केला गेला होता. याच वळणावर रामायण सीतेच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘सीया के राम’ या मालिकेत केला जाणार आहे. आपल्याकडे झाशीची राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलतान अशी खूप कमी उदाहरणे आहेत ज्यांनी स्वबळावर काळाच्या विरोधात जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय इतर स्त्रियांचे कार्य केवळ आई, पत्नी या भुमिकेतूनच थोर असल्याचे दिसून येते. त्यामुळे टीव्हीवर सध्यातरी स्त्रीप्रधान कथानकांची मक्तेदारी असल्याने मालिकांचं कथानक अशा रीतीने फिरवलं जात आहे असं अभिनेत्री रेणुका शहाणे यांना वाटतं. कारण काहीही असो.. सध्या इतिहासातील स्त्रियांना नव्याने पाहण्याची दृष्टी टीव्हीने दिल्याचं चित्र दिसतं आहे हे नक्की..
प्रसिद्धी कार्यक्रमांमध्येसुद्धा खंडोबा म्हणून लोक देवदत्तचे पाय पकडतात. त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा त्याला या गर्दीचा त्रासही सहन करावा लागतो. पण म्हाळसाच्या करारीपणाच्या दहशतीमुळे कोणीही मुख्यत्वे पुरुष सहसा माझ्या जवळपास फिरकण्याचे धाडस करत नाही. ही तिच्या व्यक्तिरेखेची ताकद आहे.
-सुरभी हांडे.
घराची जबाबदारी कुशलतेने सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या मालिका सध्या टीव्हीवर गाजताहेत. मालिकेत पोलीस अधिकारी असली तरी सून म्हणून तिने तिचं कर्तव्य बजावल्यावरच नायिकेला कौतुकाची थाप मिळते. त्यामुळे इतिहासातूनही अशीच उदाहरणं जाणीवपूर्वक घेतली जात आहेत.
– रेणुका शहाणे