मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
वेबसीरिज
१९८० च्या दशकात स्त्रियांनी करिअर करणं, तशी स्वप्नं बघणं या गोष्टी समाजाच्या पचनी पडत नव्हत्या. अशा काळातील स्त्री कुस्तीपटू ही संकल्पना पडद्यावर आणणं आणि ती लोकप्रिय करणं हा प्रवास थक्क करणारा आहे.
डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजेच ‘वर्ल्ड व्रेिस्लग एन्टरटेन्मेंट’ हे व्यावसायिक कुस्ती क्षेत्रातील मोठं नाव आहे. वेगवेगळ्या गटांमधील बलाढय़ कुस्तीपटूंचे दर आठवडय़ाला रंगणारे सामने, त्याच्या चुरशी, हेवेदावे याचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. अर्थात या खेळात रंगणारे सामने किती खरे आणि किती खोटे याच्यावर होणारे वाद नित्याचे आहेत. पण या वादांचा खेळाच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झालेला नाही. १९५० च्या दशकात उदयास आलेली ही संकल्पना आजही तुफान लोकप्रिय आहे. अर्थात पुरुष कुस्तीपटूंच्या टीव्ही कार्यक्रमांना सुरुवात झाली असली, तरी स्त्री कुस्तीपटू ही संकल्पना पचनी पडायला ८०च्या दशकाची वाट पाहावी लागली. डेव्हिड मॅकलेनला पुरुषांच्या कुस्तीच्या सामन्यांच्या दरम्यान वेळ भरण्यासाठी छोटय़ा स्वरूपात रंगणाऱ्या स्त्री कुस्तीचा वाढता चाहतावर्ग पाहून स्त्री कुस्तीपटूंचा स्वतंत्र टीव्ही कार्यक्रम सुरू करायची संकल्पना सुचली. सुरुवातीला या संकल्पनेवर टीका करण्यात आली, पण अल्पावधीत ‘ग्लो’ म्हणजेच ‘गॉर्जयिस लेडीज ऑफ व्रेिस्लग’ हा कार्यक्रम यशस्वी झाला. नेटफ्लिक्सवर गेल्या दोन वर्षांत गाजत असलेली ‘ग्लो’ ही मालिका ८० च्या दशकातील स्त्री कुस्तीपटूंच्या प्रवासावर आधारित आहे.
बी ग्रेडचे भयपट तयार करणाऱ्या दिग्दर्शक सॅम सिल्व्हियाकडे स्त्री कुस्ती या विषयावर टीव्ही कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी घेऊन नवोदित निर्माता बॅश हार्वर्ड येतो. गर्भश्रीमंत बॅशने याआधी केलेले प्रयोग फसलेले असतात. त्यामुळे त्याच्या नव्या कल्पनेवर पसे लावायला त्याच्या आईची हरकत असते. त्यामुळे अतिशय तुटपुंज्या पशांमध्ये ‘ग्लो’ यशस्वी करायचं आव्हान बॅशवर असतं. सगळे सिनेमे सपाटून आपटल्यामुळे सॅमकडे काम नसतं. त्याच्या नव्या कथानकावर कोणताही निर्माता पसे लावायला तयार नसतो. अशा वेळी इच्छा नसूनही पसे कमवायला हा कार्यक्रम स्वीकारण्याशिवाय त्याला पर्याय नसतो. लॉस एंजिलीसमध्ये तो मालिकेसाठी ऑडिशनची घोषणा करतो. दुसरीकडे अभिनेत्री म्हणून आपलं नशीब आजमावायला लॉस एंजिलीसमध्ये आलेल्या रुथची काम मिळविण्यासाठी वणवण चालू असते. घरभाडं थकलेलं, दोन वेळचं खायला पसे नाहीत, अशा परिस्थितीत रुथ या ऑडिशनला येते. कुस्तीच्या िरगणात आयोजित केलेल्या ऑडिशनची सॅमकडून माहिती मिळाल्यावर अध्र्याहून अधिक मुली निघून जातात. रुथप्रमाणे कामाची निकड असलेल्या काही निवडक मुली मात्र कामाच्या गरजेपोटी थांबतात आणि कुस्तीपटू म्हणून कार्यक्रमात रुजू होतात. ऑडिशनदरम्यान आगाऊपणा केल्यामुळे सॅम तिला कार्यक्रमातून बाहेर काढणारच असतो, पण तितक्यात तिथे डेबी येते. आपली जिवलग मत्रीण असूनही रुथने आपल्याच नवऱ्यासोबत संबंध ठेवल्याचे कळल्याने डेबी चिडलेली असते. तिच्यामध्ये आणि रुथमध्ये मारामारी होते. त्यात सॅमला आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा दिसायला लागते. त्यातच डेबीने कधीकाळी प्रसिद्ध मालिकेत काम केलेलं असल्यामुळे तिच्यामुळे या कार्यक्रमाला नावाजलेला चेहराही मिळेल असा विचार सॅम करतो. इकडे डेबी मात्र रुथचं तोंडसुद्धा पहायला तयार नसते. पण चतुर सॅम डेबीला कुस्तीच्या निमित्ताने रुथवर राग काढायची सतत संधी मिळेल आणि जादा पगारही मिळेल असं आमिष दाखवून कार्यक्रमात सामावून घेतो. इथून कार्यक्रमातील कलाकार म्हणजेच स्त्री कुस्तीपटूंची टोळी जमते आणि ‘ग्लो’ची सुरुवात होते.
कार्यक्रमाचा पाया कुस्ती असला तरी या सामन्यांची रंगत वाढवायला िरगणात उतरणाऱ्या प्रत्येक कुस्तीपटूला विशिष्ट व्यक्तिरेखा दिली आहे. उदाहरणार्थ, मुख्य नायिका असलेली डेबी अमेरिकन स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी ‘लिबर्टी बेल’ ही व्यक्तिरेखा साकारत असते, तर रुथ खलनायकी सोवियत साम्यवादी विचारांच्या ‘झोया द डिस्ट्रॉयर’च्या व्यक्तिरेखेत असते. ८० च्या दशकात अमेरिका विरुद्ध रशिया हा वाद ऐरणीवर होता. अमेरिकी समाजातील रशियाबद्दलच्या रागाचा वापर करून दोन्ही पक्षांना एकमेकांच्या विरोधात िरगणात उतरविल्याने साहजिकच प्रेक्षक त्यात गुंततो. भारतीय वंशाची आरती, आखाती दहशतवादी विरुद्ध अभ्यासू ब्रिटानिका, कृष्णवर्णीय वेल्फेर क्वीन विरुद्ध कट्टर श्व्ोतवर्णीय वृद्ध स्त्रिया, चीन विरुद्ध अमेरिका अशी प्रेक्षकांची भावनिक नस पकडणाऱ्या जोडय़ा बनविण्यात आल्या. ८०च्या दशकातील भडक मेकअप आणि झगमगीत कपडेपट वापरून तो काळ मालिकेत जिवंत केला आहे. (पान ४७ वर)
विशेषत: अत्याधुनिक कॅमेरा वापरण्याचा मोह टाळून टीव्हीच्या सुरुवातीच्या काळाप्रमाणे प्रकाशयोजना आणि चित्रीकरण केल्यामुळे मालिकेचं कथानक ८० च्या दशकात घडत असल्याचे जाणवत राहते.
‘ग्लो’ मालिकेचे निर्माते लिझ फ्लाहीश आणि कार्ली मेंश यांना स्त्रीप्रधान मालिका बनवायची होती. दरम्यान ८० च्या दशकातील ‘ग्लो’ कार्यक्रमाबद्दलचा माहितीपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातील मूळ कुस्तीपटू तसेच या खेळाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या स्त्री कलाकारांबद्दलच्या कुतूहलातून त्यांनी या कथानकावर मालिका बनविण्याचा निर्णय घेतला. मूळ कार्यक्रमाची निर्माती आणि कुस्तीपटू-कलाकार उर्सलिा हेडरसुद्धा मालिकेत मार्गदर्शक म्हणून रुजू झाली. ८० च्या दशकातील ‘ग्लो’ कार्यक्रमाशी किंवा त्यातील कलाकारांशी या मालिकेचा थेट संबंध नाही. मालिकेची संकल्पना कार्यक्रमावर आधारित असली तरी यातील पात्रं, कथानक पूर्णपणे काल्पनिक आहे. निर्मात्यांचा मूळ उद्देश हा स्त्रीप्रधान मालिका बनविण्याचा असल्यामुळे मालिकेमध्ये स्त्री-स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे सुंदर रेखाटण्यात आले आहेत. वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेल्या पण पसे कमविण्याची अत्यंत निकड असलेल्या दहा स्त्रिया एकत्र आल्यावर त्यांचे संबंध कसे बदलत जातात हे मालिकेत बारकाईने मांडले आहे. नवऱ्याला घरातून बाहेर काढल्यावर त्याचा मदतनीस त्याच्या पलंगाचा ब्रॅण्ड विचारतो. ते बघून ‘आपण मुलासाठी प-प जोडतोय आणि नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा अजूनही सुरू आहे,’ या विचाराने चवताळलेली डेबी घरातलं सगळं सामान विकून टाकते, पण मुलाचं सामान तसेच ठेवते. रात्री त्याच्या पाळण्याशेजारी जमिनीवर झोपी जाते. अशा प्रसंगातून तिचा मुलात अडकलेला जीव दिसतो. रुथशी कितीही वाद असले, तरी गर्भपातासाठी तिच्यासोबत दवाखान्यात गेलेला सॅम तिथे आपली ओळख तिचा नवरा अशी करून देतो. अशा अवघड प्रसंगी ती एकटी नाही, आपण मित्र म्हणून तिच्यासोबत आहोत, ही जाणीव तो तिला नकळत करून देतो. िरगणात आईवर वंशद्वेषाचे हल्ले होताना पाहून नाराज झालेला टॅमीचा मुलगा, आपली आई हे सगळं आपल्या उच्चशिक्षणासाठी सहन करतेय या भावनेने वरमतो. ‘मुलींचा जन्म हा फक्त लग्न करून नवऱ्याला खूश ठेवण्यासाठी झालेला असतो,’ असे विचार असलेला, कुस्ती खेळणाऱ्या मुलीशी सगळे संबंध सोडणारा बाप प्रेक्षकांमध्ये बसून टाळ्या वाजवतो, तेव्हा कारमनचा खेळ खरा रंगतो. अशा छोटय़ा छोटय़ा भावनिक कथानकांची जोड मालिकेला दिली आहे. त्यामुळे मालिका निव्वळ कुस्तीचा कार्यक्रम बनून न राहता या सगळ्यांची गोष्ट बनते. मुळात कार्यक्रमात निवड झालेल्या रुथसकट सगळ्याच तरुणी हातावर पोट घेऊन जगत असतात. त्यांचे जगावेगळे स्वभाव, त्यामुळे घरच्यांशी बिघडलेले संबंध, होतकरू अभिनेत्री म्हणून समाजाकडून होणारी अवहेलना या सगळ्यातून प्रत्येक जण जात असते. या कार्यक्रमानिमित्ताने आपण काही तरी करू शकतो, आपल्यासारखा विचार करणाऱ्या इतर जणीही आहेत, हे पाहून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सॅम कल्पक पात्रं निर्माण करण्याची आणि प्रेक्षकांना आकर्षति करण्यासाठी सामने अधिकाधिक रंगतदार करण्याची जबाबदारी या प्रत्येकीवर टाकतो. त्यामुळे आपल्या विचारांना इथं महत्त्व आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. साहजिकच सुरुवातीच्या काळात एकमेकांबद्दल असलेला मत्सर गळून पडतो आणि त्या एकत्र येतात. प्रसंगी सॅमच्या आततायीपणाविरुद्ध एकत्र उभ्याही राहतात. वेळप्रसंगी पुरुष कुस्तीपटूंना ‘आम्हीही कमी नसल्याची’ जाणीव करून देतात. या कार्यक्रमाने आपल्याला ओळख मिळाली आहे, चाहतावर्ग मिळाला आहे या भावनेतून एकत्र येऊन त्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी निरनिराळ्या कल्पना सुचवतात. प्रसंगी स्वतकडील पसे खर्च करून प्रेक्षक जमवतात. ७०च्या दशकात नोकरी, तसेच वैचारिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकन स्त्रियांनी चळवळ उभारली. त्यानंतर उदयास आलेल्या स्त्री कुस्ती या क्रीडाप्रकाराकडे सन्मानाने पाहिलं जाऊ लागलं. ‘ग्लो’सारखा कार्यक्रम सुरू करून तो यशस्वी करण्यामागची त्यावेळच्या कुस्तीपटू- अभिनेत्रींची मेहनत या मालिकेत उठून दिसते. आपल्या हक्कांच्या केवळ मागण्या करण्यापेक्षा थेट िरगणात उतरून आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या स्त्रियांच्या प्रवासाची दखल घ्यायलाच हवी.
सौजन्य – लोकप्रभा