८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. प्रत्येक स्त्रीचा, तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागलेल्या वेदनेचा आणि अनुभवता आलेल्या सर्जनत्वाचाही! महिला, मुलगी, आई, बहिण, प्रेयसी अशा विविध रुपांत आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर ‘ती’ची भूमिका फारच महत्त्वाची असते. पण, फक्त ‘ती’चं महत्त्व या एकाच दिवशी सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाचं का असतं? स्त्रीचं अस्तित्व, तिची ओळख या एका दिवसापुरतीच मर्यादित असते का? असे बरेच प्रश्न हल्ली अनेकांच्या मनात घर करतात. याच प्रश्नांबद्दल आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना नक्की काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत. गुलाबी हा स्त्रियांसाठी नेहमीच आवडता रंग असतो. चॉकलेट्स म्हणजे कोणत्याही मैत्रिणीची आवडती गोष्ट…. ही अशी विचारसरणी कुठेतरी बदलण्याची गरज आहे. त्यामुळे रंग, आवडीनिवडी, व्यावसायिक क्षेत्रांची निवड या सर्वच बाबतीत आजवर महिलांना गृहित धरणं कुठेतरी थांबलं पाहिजे ही गरज आज प्रकर्षाने व्यक्त केली जात आहे. याबद्दलच आपले विचार व्यक्त करत आहेत आपली लाडकी कलाकार मंडळी….
‘तूच तुझी ढाल हो’
“माझी बहिण, आई, आणि माझी बायको याच माझी ताकद आहे. या महिला दिनी मला सगळ्या स्त्रियांना हेच सांगावस वाटत की, स्त्रियांमध्ये प्रचंड शक्ती आहे, तिला कोणाच्या मदतीची वा तिची कोणी ढाल होण्याची गरज नाहीये. ती स्वत:चे रक्षण स्वत:च करू शकते इतके सामर्थ्य तिच्यामध्ये आहे . कोणत्याही स्त्रिला तिचे रक्षण करण्यासाठी भावाची, नवऱ्याची वा वडिलांची गरज वाटायला नको. वेळ पडली तर ती संपूर्ण जगावर हावी होऊ शकते इतकी ताकद आहे तिच्यामध्ये. आणि जेव्हा हे त्यांना कळेल तेव्हा त्यांचे भाऊ, नवरा, वडील या सगळ्यांचीच चिंता मिटेल कारण त्यांना माहिती असेल की माझ्या आयुष्यात असलेली स्त्री स्वत:चे रक्षण करू शकते. त्यामुळे या नवीन वर्षी या गोष्टीचा नक्की विचार करा आणि ते सामर्थ्य स्वत: मध्ये आणा. महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.
– अक्षर कोठारी ( चाहूल )
स्वत:चा मान राखा
स्वत:ला कधीच कमी लेखू नका, कारण असं झालं तर लोक त्याचा फायदा घेण्यासाठी नेहेमीच बसलेले असतात. स्त्री म्हणून तुमचा जन्म झाला आहे, याचा अभिमान बाळगा. स्वत:ला सक्षम बनवा. तुम्ही केवळ स्त्री आहात म्हणून त्याचा उगाचाच फायदा घेऊ नका. खंबीर बना आणि स्वत:चा मान राखा. जर तुम्ही स्वत: चा मान राखला तरच बाकीचे देखील तुम्हाला मान देतील हे विसरू नका.
– शाश्वती पिंपळीकर ( चाहूल )