पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या ‘सेल्फी विथ डॉटर’ योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पण सेल्फी किंवा अशाप्रकारच्या योजनांनी महिलांच्या समस्या सुटणार नसल्याचे अभिनेत्री रिचा चड्डाने म्हटले आहे.
रिचा म्हणाली की, पंतप्रधानांनी घेतलेला पुढाकार हा चांगला आहे. यात कोणतीही हानी नाही. पण, हा शहरी पुढाकार असल्यासारखे मला वाटते. हे केवळ स्मार्टफोन वापरणा-यांना जमण्यासारखे आहे. ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत त्यांच काय? हुंडा, लैंगिक शोषण, छेडछाड आणि अशा अन्य समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. या समस्या सेल्फी किंवा त्याच्यासारख्या योजनांनी सुटणा-या नाहीत. आगामी ‘मसान’ चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी रिचाने आपले सेल्फीबाबतचे मत मांडले. या चित्रपटात वडिल-मुलगी यांच्या नात्यादरम्यान येणा-या समस्या मांडण्यात आलेल्या आहेत. वडिल-मुलीच्या नात्यावरील कोणते बॉलीवूड चित्रपट तुला भाळले असे विचारले असता रिचाने ‘डॅडी’ आणि ‘मिली’ या दोन चित्रपटांची नावे घेतली. या दोन्ही चित्रपटांमध्ये वडिल-मुलीचे नाते खूप सुंदरित्या चित्रीत करण्यात आलेले आहे. मात्र, ‘मसान’मधील वडिल तसे नाहीत. यातील वडिल त्यांची मुलगी देवी (रिचा चड्डा) हिला अजिबात मदत करत नाहीत आणि उद्धटपणे वागतात. एकंदरीत त्यांची परिस्थिती पाहता ते कुठेतरी योग्यही आहे, असे ती म्हणाली.
‘मसान’ येत्या शुक्रवारी म्हणजेच २४ जुलैला प्रदर्शित होत असून, याची कान चित्रपट महोत्सवातही प्रशंसा करण्यात आली होती.

Story img Loader