ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचे मत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : गल्लाभरू चित्रपट मानसिक आजारांविषयी चुकीचा संदेश देत असल्याने या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित झालाय. मानवी भावना समृद्ध करणारे चित्रपट दुर्मिळ  होत आहे. मोबाईलमध्ये कॅमेरा आला असला तरी इमेज, साऊंडची भाषा अनुभवातून समृद्ध होते. तीच हरवत असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

जागतिक मेंदू दिनाच्या निमित्ताने रविवारी इंडियन अकादमी ऑफ न्यूरॉलॉजी, नागपूर न्युरो सोसायटी, सायकॅट्रिक सोसायटी व ऑरेंजसिटी कल्चरल फाऊं डेशनने आयोजित कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.

डॉ. आगाशे निर्मित ‘अस्तू’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. डॉ. आगाशे म्हणाले की, समाजात लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवले आहे, की चित्रपट हे करमणुकीचे माध्यम आहे. चित्रपटातील संवाद, त्यातील दृश्यामुळे नकळत आपण आपली मते बनवतो. त्या मतांवरच आपला दृष्टिकोन ठरतो. जर चित्रपटातून चुकीची माहिती दाखवली गेली तर चुकीचे मत तयार होण्याची शक्यता आहे. मानवी भावना समृद्ध करणारा सिनेमा दुर्मिळ होतोय. मोबाईलमध्ये कॅमेरा आला असला तरी इमेज आणि साऊंडची भाषा अनुभवातून समृद्ध होते. तीच हरवत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

पैशाने सर्व मिळते ही भाबडी समजूत

आजची शिक्षण व्यवस्था अक्षर लिहायला, वाचायला शिकवते, पण एखाद्या बाबीकडे पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची प्रगल्भता देत नाही. डोळे, कान, नाक, त्वचा, मन, बुद्धी ही संवेदनेची सेंसर्स त्यामुळे बधिर होत आहेत. त्यामुळे आपल्या घरात डोकावून पाहण्यासाठी कोणालाच वेळ नाही. सध्याची शिक्षण व्यवस्था ही केवळ डिग्री मिळणारे कारखाने झाल्याचे दिसते. पैशाने सगळे काही विकत घेता येते, अशी आपली भाबडी समजूत झाली आहे, असे मत डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World brain day 2018 actor dr mohan agashe