राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ‘फॅण्ड्री’ या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर झी मराठीवर दाखविण्यात येणार आहे. याचसोबत झी मराठी एक अनोखे पाऊल उचलत आहे. रविवार, २९ जून रोजी सायंकाळी सात वाजता ‘फॅण्ड्री’ चित्रपटाचे झी मराठीवर प्रक्षेपण करताना सामाजिक भाष्य करणा-या या परिणामकारक चित्रपटाच्या निमित्ताने जाणीव झाली…. बदल हवा हे घोषवाक्य घेऊन रसिकांना सामाजिक बदलाचे घटक होण्यासाठी, त्याचे साक्षीदार होण्यासाठी झी मराठी आवाहन करत आहे.
जाणीव झाली…. बदल हवा या उपक्रमात लहान मुलांसाठी काम करणा-या दहा सामाजिक संस्थांची निवड करून त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख चित्रपटाच्या प्रिमियर दरम्यान रसिकांना करून देण्यात येईल. यात आदिवासी आणि अनेक वंचित मुलांसाठी काम करणारी विदर्भातील लोक बिरादरी प्रकल्प, अहमदनगर येथील विशेष मुलांसाठी कार्यरत असणारी स्नेहांकूर व स्नेहालय संस्था, सोलापूर आणि महाराष्ट्राच्या दुर्गम भागात मुलांच्या शिक्षणासाठी आणि पाठ्यपुस्तकाबाहेरील शिक्षणासाठी काम करणारी क्वेस्ट डॉट ऑर्ग इन, वंचित आणि गरीब मुलांच जगणं सुकर करण्यासाठी गेली वीस वर्ष झटणारी एकलव्य बालशिक्षण आणि आरोग्यन्यास ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था, फासेपारधी आणि भटक्या विमुक्त जमातीतील मुलांच्या भवितव्यासाठी काम करणारी पुनरुत्थान समरसता गुरुकुल, निर्मदेच्या खो-यातील विस्थापितांच्या मुलांसाठी शिक्षण आणि निवारा मिळवून देण्याकरिता अविरत झटणारी नर्मदालय, डिस्लेक्सिया आणि मेंदूच्या क्षयाने पिडित मुलांसाठी कार्यरत असलेली पुण्याची प्रिझम, रस्त्यावरील मुलांसाठी काम करणारी हमारा फाऊंडेशन या आणि अशा दहा सामाजिक संस्था यात सहभागी आहेत.
या उपक्रमात विक्रम गोखले, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, उर्मिला मातोंडकर, सोनाली कुलकर्णी, सचिन पिळगावकर, मकरंद देशपांडे हे सामाजिक समानता असलेले कलाकारदेखील सक्रीय सहभाग घेत आहेत. या कलावंतांसह सामाजिक उपक्रमात सामिल होण्यासाठी एका नव्या बदलाचे घटक होण्यासाठी पहा,त फॅण्ड्री येत्या रविवारी, २९जून रोजी सायंकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा