नाट्यक्षेत्रात विश्वविक्रम घडवणाऱ्या ‘अलबत्या-गलबत्या’ या बालनाट्याची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली आहे. जागतिक टपालदिनी या नाटकात चेटकिणीची भूमिका करणारे अभिनेते वैभव मांगले आणि प्रयोगशील निर्माते राहुल भंडारे यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट जाहीर करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

भारतीय डाक विभागाच्या मुंबई पूर्व विभागातर्फे ‘नॅशनल पोस्टल वीक’ येत्या ११ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबरदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात अभिनेते वैभव मांगले आणि नाट्यनिर्माता राहुल भंडारे यांच्या पोस्टल तिकिटाचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.

‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्यातील चिंची चेटकिणीची भूमिका साकारत वैभव मांगले यांनी तीन वर्षांच्या लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना चेटकिणीच्या प्रेमात पाडले. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आहेत. तर गेली १५ ते १६ वर्षे व्यावसायिक नाट्य क्षेत्रात एक यशस्वी निर्माता म्हणून राहुल भंडारे कार्यरत आहेत. नाट्य क्षेत्रात कोणताही कौटुंबिक वारसा नसताना, आर्थिक पाठबळ नसताना नाटक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली. या रंगभूमीला वेगवेगळ्या आशय, विषय आणि चौकटीबाहेरच्या कलाकृती त्यांनी दिल्या. नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नसून लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे माध्यम होऊ शकते यावर ठाम विश्वास दाखवत, ‘शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीम नगर मोहोल्ला’, ‘ठष्ट’, ‘बॉम्बे १७’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ यांसारख्या धाडसी आणि सामाजिक भान निर्माण करणाऱ्या संहिता व्यावसायिक रंगभूमीवर आणल्या. या दोन्ही कलावंतांनी रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय टपाल विभागातर्फे  त्यांना तिकिटाच्या रूपाने कौतुकाची थाप देण्यात आली आहे.