अलीकडे मराठी चित्रपटांतील कथांमध्ये आलेले वैविध्य लक्षणीय आहे. ‘बाबांची शाळा’ हा असाच एक वेगळ्या कथेवरचा,वेगळे भावविश्व रेखाटणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर होणार आहे. रविवार ५ फेब्रुवारीला दुपारी एक आणि रात्री साडेआठ वाजता हा चित्रपट दाखवला जाणार आहे. एखाद्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला मिळालेली शिक्षा ही केवळ त्याच्यापुरतीच रहात नाही, तर त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला सोसावी लागते. रागाच्या भरात हातून गंभीर गुन्हा घडल्यानंतर महिपत घोरपडेला न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते. या कटू अनुभवावर महिपत कशा पद्धतीनं मात करतो, आपल्या लहान मुलीबरोबरचं भावनिक नातं कसं जपतो याचं चित्रण या चित्रपटात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या गुन्हाची शिक्षा भोगणारा महिपत घोरपडे, त्याची मुलगी सोनाली, तुरुंगाधिकारी श्रीकांत जमदाडे आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता साटम यांची गोष्ट या चित्रपटात आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. विराज यांनी केलं आहे. या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे तुरुंगाधिकारी श्रीकांत जमदाडे यांची भूमिका सयाजी शिंदे यांनी संस्मरणीय केली आहे. महीपत घोरपडेची भूमिका शशांक शेंडे शब्दश: जगले आहेत.

सयाजी शिंदे आणि शशांक सोबत ऐश्वर्या नारकर, कमलेश सावंत, छाया कदम, आरती मोरे, कार्तिक चव्हाण, उमेश बोळके, मिलिंद अधिकारी यांसह बाल कलाकार गौरी देशपांडे आदींच्या मुख्य भूमिका आहेत. अत्यंत वेगळ्या धाटणीच्या या कथानकाचं प्रेक्षक आणि समीक्षकांनीही कौतुक केलं होतं. आपल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप होऊन समाजात पुन्हा शांततेनं आयुष्य जगू इच्छिणाऱ्यांना समाजानं बळ दिलं पाहिजे असा विचार मांडणारा हा चित्रपट आवर्जून पहायला हवा असाच आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World television premier of marathi film babanchi shala
Show comments