राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ या दिवशी मोठी फूट पडली. कारण अजित पवार हे त्यांच्या बरोबर काही आमदार घेऊन थेट सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. महायुतीचं सरकार राज्यावर आहे.
राष्ट्रवादीत उभी फूट आणि दोन गट
राष्ट्रवादीतली उभी फूट ही काका-पुतण्यांमधली फूट आहे. कारण शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट या फुटीनंतर निर्माण झाले. हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात होता. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांची राजकीय गळचेपी केली असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तर दिल्लीचा दगा नवा नाही आम्ही शरद पवारांबरोबरच आहोत असं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात आता लेखक अरविंद जगताप यांनी या घडामोडींवर एक ओळ पोस्ट केली आहे जी सोशल मीडियावर प्रचंड गाजते आहे.
हे पण वाचा- ‘थकणार नाही, झुकणार नाही, कुणाला सांगताय म्हातारा झालोय’, राष्ट्रवादीने पोस्ट केला शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ
काय म्हटलं आहे अरविंद जगताप यांनी ?
“घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही. हा जमाना आकड्यांचा आहे.’ अशी एक ओळ पोस्ट करुन लेखक अरविंद जगताप यांंनी सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह घड्याळ आहे. हे घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं आहे. त्यानंतर घड्याच्या काट्यांचा संदर्भ घेऊन अरविंद जगताप यांनी ही एका ओळीची पोस्ट लिहिली आहे. जी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.
निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?
निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला की अजित पवारांकडे जे आमदारांचं संख्याबळ आहे त्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह म्हणजेच राष्ट्रवादीचं घड्याळ हे अजित पवारांना देण्यात येतं आहे. हा निर्णय आल्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष केला. तर शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि निषेध मोर्चे काढल्याचं पाहण्यास मिळालं. आता या सगळ्या परिस्थितीवर अरविंद जगताप यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे.