एखाद्या गंभीर परिस्थितीत विचित्र वाटावी अशी घटना घडते. तो सगळा गोंधळ पाहिल्यावर कुणाचं काय आणि कुणाचं काय? असा विचार मनात चमकून जातो, पण चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहात नाही. असाच काहीसा भाव लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता अशा वेगवेगळ्या आघाड्या सांभाळणाऱ्या सुमित पाटील यांचा ‘विषय हार्ड’ चित्रपट पाहताना मनात उमटतो. करोना काळातील कडक टाळेबंदीत आर या पार करायचा निर्णय घेणाऱ्या दोन प्रेमी जिवांची खुसखुशीत कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेमाचा विषयच मुळात हार्ड. एकतर चटकन ते गवसत नाही आणि एकदा आपल्या माणसाचा हात हातात आला की तो काही केल्या सोडवत नाही. इथे तर लहानपणीपासून एकनिष्ठ असलेल्या प्रेमाची भंबेरी उडते. चाकोरी नावाचं गाव आणि त्यात घडणारी चाकोरीबाहेरची गोष्ट रंगवण्यासाठी पहिल्याच फ्रेमपासून दिग्दर्शकाने काहीशी वेगळ्या पद्धतीची मांडणी केली आहे.

चित्रातलं गाव पाहता पाहता जिवंत होणारी दृश्यचौकट आपल्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळणार याची जाणीव करून देते. तर संद्या आणि डॉली या दोघांची ही गोष्ट. शाळेच्या निरागस वयात डॉलीने प्रयोगशाळेत फसलेलं संद्याचं रसायन गुलाबी करून टाकलं. तेव्हापासून त्यांची भिडलेली नजर आणि मनात उमललेली प्रेमाची कळी अजूनही ताजी आहे. या प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशी ठाम इच्छा असलेला संद्या पैसा कमावण्यासाठी शहरात जातो. मात्र सहा महिन्यांच्या आतच करोनामुळे टाळेबंदी लागते आणि गावात येऊन थेट विलगीकरण केंद्रात संद्या येऊन पडतो. त्याच वेळी करोना आहे तर डॉलीचं लग्न थोडक्यात उरकून घ्यावं अशी इच्छा तिच्या वडिलांच्या मनात जागते. आणि खऱ्या अर्थाने संद्या-डॉलीसाठी प्रेमाचा विषय हार्ड होऊन बसतो. टाळेबंदीत हा प्रेमाचा अडकलेला गुंता कसा सुटतो याचं गमतीशीर आणि घोळात घोळ पद्धतीचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.

हेही वाचा >>>“तरस नहीं आया…”, पुष्कर जोगने ‘या’ अभिनेत्रीसह केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

एखादा विषय मांडताना त्याच्या कथाविस्ताराच्या मर्यादा लक्षात घेऊन पटकथेची बांधणी केली तर त्याचा फायदा सुटसुटीत आणि सोप्या मांडणीसाठी होऊ शकतो हे चित्रपट पाहताना लक्षात येतं.

लेखक आणि दिग्दर्शक सुमित याने पहिल्याच प्रयत्नात पटकथेचा डोलारा आणि मांडणीचा बाज यांचं समीकरण नेटाने सांभाळलं आहे. मुळात चित्रपटाचं कथाबीज छोट्या स्वरूपाचं आहे. टाळेबंदीत डॉलीचं ठरलेलं लग्न मोडून संद्या तिला आपलंसं कसं करणार? हा यातला मुख्य भाग. त्याकडे येण्याआधी करोना आल्यानंतर सुरुवातीला याबाबतीत सगळीकडेच असलेला गोंधळ आणि अज्ञान, त्यात सरकारी पातळीवर नियंत्रण-नियमांचा भार सांभाळत करोना पसरू नये म्हणून पोलीस पाटलापासून ते तहसीलदारापर्यंत सगळ्याच यंत्रणेतील अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ हा निरीक्षणात्मक पद्धतीचा भाग या कथेत खुबीने पेरला आहे. त्यामुळे एका टुकार शाळेत दोन-तीन खाटा टाकून उभारलेलं विलगीकरण केंद्र, तिथे संद्यासारखी अडकलेली आणखी दोन-तीन डोकी, शिपाई – पोलीस पाटील आणि टाळेबंदीतही मुखपट्टी लावून, निवडक गावकऱ्यांना भजनासाठी एकत्र आणत करोना पसरू नये म्हणून भल्लाळदेवाला भजन म्हणत साकडं घालणारे चिंतातुर सरपंच अशा एकेक नमुनेदार व्यक्तिरेखांची पेरणी लेखक – दिग्दर्शकाने केली आहे. एकीकडे कथाचित्रण आणि त्यातून वास्तवाचं भानही क्वचित आणून देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. टाळेबंदीच्या त्या काळात महाराष्ट्रातील गावखेड्यात पोहोचलेल्या डिजिटल क्रांतीने नाही म्हटलं तरी खूप मोलाचं काम केलं. आरोग्य अधिकारी, पाटील, तहसीलदार, सरपंच सगळी यंत्रणा या मोबाइलवर होणाऱ्या झूम मीटिंग्जच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कातही राहिली आणि अगदी काटेकोर नसली तरी बऱ्यापैकी करोना नियंत्रणासाठी आवश्यक नियमावलींची अंमलबजावणी दूरवरही शक्य झाली, हेही दिग्दर्शकाने सहज जाता जाता दाखवून दिलं आहे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे कथाबीज छोटं असल्याने घोळात घोळ गंमत वाढवण्यासाठी काही निरर्थक व्यक्तिरेखा, प्रसंग यांची पेरणी चित्रपटात आहे. त्यातही अनेक संदर्भ पुढे काय होणार हे न सांगताच सोडून दिले आहेत. त्यामुळे निव्वळ कथानक वाढवण्यासाठी झालेली त्यांची मांडणी लक्षातही येते आणि खटकते. ही सगळी विसंगती विनोदी मांडणी आणि कलाकारांचा अभिनय यांच्या आधारे सावरण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी जमला असल्याने चित्रपट पाहताना गंमत येते. सुमित आणि अभिनेत्री पर्ण पेठे या मुख्य जोडीने आपापल्या शैलीत संद्या आणि डॉली रंगवले आहेत. नावाने डॉली असली तरी ती अगदी तडकभडक नाही. एकाच वेळी निरागस आणि तितकीच खमकी अशा डॉलीच्या भूमिकेत पर्णला पाहणं हा सुखद अनुभव आहे. सुमितनेही सहजशैलीतच संद्याची भूमिका रंगवली आहे. पोलीस पाटील, डॉलीचे बाबा, ड्रायव्हर, संद्याचा मित्र अशा काही साध्या तर काही विचित्र व्यक्तिरेखा त्या त्या कलाकारांनी उत्तम रंगवल्या आहेत. वास्तविक शैलीतला त्यांचा अभिनय आणि एकूण मांडणी असल्याने चित्रपट उगाच ओढूनताणून केलेला भडक प्रयोगही वाटत नाही आणि त्यातली गंमतही अनुभवता येते. भल्लाळदेवाला साकडं घालणाऱ्या गाण्याच्या तालावर रंगलेला हा प्रेमाचा हार्ड विषय म्हणजे खुसखुशीत अनुभव ठरला आहे.

विषय हार्ड’

दिग्दर्शक – सुमित

कलाकार – सुमित, पर्ण पेठे, नितीन कुलकर्णी, प्रताप सोनाळे, हसन शेख, विपीन बोराटे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer director producer actor sumit patil vishay hard film released amy
Show comments