समीर विद्वांस, लेखक-दिग्दर्शक

दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेला तरुण दिग्दर्शक – लेखक समीर विद्वांस टाळेबंदीच्या काळात नवनवीन कल्पनांना आकार देण्यात मग्न आहे. असे असले तरी सध्या करोनामुळे असलेले आजूबाजूचे तणावाचे वातावरण आणि या अशा वातावरणात येणाऱ्या नैराश्याविषयीही तो खुलेपणाने बोलतो. गेल्या दोन महिन्यांच्या काळात जे जे करणे मला शक्य होते ते ते माझे करून झाले आहे. आता प्रत्येक जण यातून बाहेर पडायच्या प्रतीक्षेत आहे, असे समीर मनमोकळेपणाने सांगतो.

चित्रपट क्षेत्रात पावसाळा सुरू होण्याआधीच बरेचसे चित्रीकरण पूर्ण केले जाते. चित्रीकरणाचे तीन महिने हातून निसटल्याने सुरू असलेले अनेक प्रोजेक्ट सध्या बंद झाले आहेत, याकडे त्याने लक्ष वेधले. मी स्वत: एक नाटक बसवत होतो तेही काम थांबले. शिवाय सध्याचे चित्र अनिश्चित असल्याने काही नियोजनही करता येत नाही. त्यामुळे काहीसे अडकून पडल्याची भावना समीर व्यक्त करतो. सध्या काम सुरू नसले तरी ऑनलाइन माध्यमातून चर्चा होत असल्याचेही तो सांगतो. ‘मनातल्या कल्पना कागदावर उतरवणे सुरू आहे, कल्पनांवर चर्चाही होते आहे. याला पूर्वतयारीचा काळ म्हणता येईल. कारण सर्व सुरळीत झाल्यानंतर हातात काहीतरी असेल. त्याशिवाय आगामी वेबमालिके चे लेखन सुरू आहे’, असेही त्याने सांगितले. त्यामुळे टाळेबंदीनंतर भविष्यात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये समीर विद्वांस यांच्या वेबमालिका पाहायला मिळणार आहेत, ही यातली चांगली बातमी म्हणता

येईल.

‘हे क्षेत्र सर्जनावर अवलंबून आहे. काहीसे मुक्त. सध्या सगळे जन घरात अडकल्याने कामावर परिणाम होऊ लागला आहे. सर्जनातली मुक्तता हरवत चालली आहे. त्यात सामाजिक परिस्थितीचा विचार करता मनावर प्रचंड ताण येतो. त्यामुळे आता नवीन काही सुचणेही बंद झाले आहे’, अशी निराशाजनक बाबही समीर नमूद करतो.

सध्या बरेच कलाकार ऑनलाइन माध्यमातून कार्यशाळा, संवाद घेत आहेत. पण समीर मात्र याविषयी काहीशी वेगळी भूमिका मांडताना दिसतो. त्याच्या मते, ‘सुरुवातीला एक दोन ऑनलाइन संवाद झालेही ,परंतु त्याला अनेक मर्यादा असल्याचे लक्षात आले आहे. कार्यशाळेसाठी अनेकांनी विचारलेही पण प्रत्यक्ष शिकवणे आणि ऑनलाइन शिकवणे यात बराच फरक पडतो. ‘गिव्ह अ‍ॅण्ड टेक’ मुळे मुलांचे प्रश्न, संवाद यातून कार्यशाळा रंगत जाते ते ऑनलाइन माध्यमात होत नाही. त्यामुळे सहसा अशा कार्यशाळा मी घेत नाही, असे समीर सांगतो.

‘मनोधैर्य वाढवण्यासाठी जे जे शक्य असेल ते ते करा. त्यातून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळात आत्मबल टिकवणे जास्त गरजेचे आहे’, असे तो म्हणतो. आपल्या चाहत्यांनाही  या काळात आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही समीरने के ले आहे.

संकलन : नीलेश अडसूळ