बॉलीवूड आणि गुन्हेगारी जगत यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे जुनेच नाते आहे. गुन्हेगारी जगताचे म्हटले तर वास्तव आणि म्हटले तर जरा अवास्तव चित्रण बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमधून घडले आहे. गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंडांच्या व्यक्तिरेखाही त्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर येऊन गेल्या आहेत. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फाशी देण्यात आलेला आरोपी याकूब मेमन याच्यावर एखादा चित्रपट निघेल तेव्हा निघेल, पण बॉलीवूडच्या एका चित्रपटातून ‘याकूब मेमन’चे दर्शन यापूर्वी घडून गेले आहे.
मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटावर आधारित ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटात ‘याकूब मेमन’ची व्यक्तिरेखा दाखविण्यात आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले होते आणि चित्रपटात ‘याकूब मेमन’ची भूमिका ‘जब वुई मेट’, ‘हाय वे’या गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक इम्तियाज अली याने केली होती.
याकूब मेमनवर भविष्यात बॉलीवूडमध्ये एखादा चित्रपट तयार झाला तर याकूबची भूमिका कोण करेल तेव्हा करेल, पण ‘याकूब मेमन’च्या भूमिकेवर पहिले नाव इम्तियाज अलीचे लिहिले गेले आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा इम्तियाजचे नाव फारसे चर्चेत आलेले नव्हते. अनुराग कश्यप यांच्याबरोबरच्या मैत्रीमुळे इम्तियाज अली याने कश्यप यांच्या या चित्रपटात ‘याकूब मेमन’ची व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटात ‘याकूब मेमन’ला अटक होते, इथपर्यंतचा घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार हुसैन झैदी यांच्या ‘ब्लॅक फ्रायडे – दि ट्र स्टोरी ऑफ दि बॉम्बे बॉम्बब्लास्ट’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. यात याकूबचा भाऊ अर्थात टायगर मेमन याची भूमिका ‘नुक्कड’फेम पवन मल्होत्रा याने साकारली होती. ‘ब्कॅक फ्रायडे’ हा चित्रपट विषयामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे वादग्रस्त आणि चर्चेत राहिला होता. न्यायालयाच्या आदेशामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीही आणण्यात आली होती. मात्र न्यायालयीन सोपस्कार पार पडल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Story img Loader