या वर्षांच्या शेवटच्या सहा महिन्यातील तारखांसाठी बॉलिवूडमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे बॉलिवूडचे मोठे कलाकार एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र निर्माण होते आहे. यात मध्यंतरी प्रियांका आणि परिणीती या चोप्रा भगिनी आमनेसामने येण्याची चर्चा होती. संजय लीला भन्साळी निर्मित ‘मेरी कोम’ आणि यशराज फिल्म्स निर्मित ‘दावत-ए-इश्क’ हे दोन चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार होते. मग प्रियांकाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून परिणीतीने चित्रपटाची तारीख बदलण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात, परिणीतीमुळे नव्हे तर भन्साळींनी नकार दिल्यामुळे यशराज प्रॉडक्शनने आपली ‘दावत’ पुढे ढकलली आहे.
प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘मेरी कोम’ आणि परिणीती चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘दावत-ए-इश्क’ हे दोन चित्रपट ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होते. त्यामुळे या चोप्रा भगिनी तिकीटबारीवर आमनेसामने येणार अशी चर्चा होती. या दोघींपैकी कोणाचे पारडे जड होणार, असे पतंग हवेत उडण्याआधीच प्रियांका आणि परिणीतीने आपापल्या परीने आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही. दोन्ही चित्रपटांची शैली वेगळी आहे, त्यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, असे समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, चर्चेचा धुरळा काही खाली बसेना. अखेर, यशराजने ‘दावत-ए-इश्क’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही कोंडी सुटली तरी परिणीतीच्या प्रयत्नांमुळे चित्रपट पुढे ढकलला गेला असे सांगत भगिनीप्रेमाचा रंग या सगळ्या ढकलाढकलीला देण्यात आला होता. मात्र, यशराजला परिणीतीमुळे नव्हे तर संजय लीला भन्साळींमुळे दावत पुढे ढकलावी लागली आहे.
भन्साळींचा ‘मेरी कोम’ याआधी २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. त्याचवेळी सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हृतिक आणि कतरिनाचा ‘बँग बँग’ आणि विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकाचवेळी तीन चित्रपट प्रदर्शित झाल्याने आपलेच नुकसान होईल, असा विचार करून भन्साळींनी ‘मेरी कोम’ ५ सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यशराज फिल्म्सने याआधीच ‘दावत-ए-इश्क’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तीच तारीख जाहीर केली होती. त्यामुळे, यशराज फिल्म्सकडून भन्साळींना पुन्हा एकदा तारीख बदलण्याची विनंती करण्यात आली. पण, दुसऱ्यांदा तारीख बदलणे मला परवडणारे नाही. ‘मेरी कोम’ चित्रपटाची प्रसिध्दीही सुरू झाली असून आपण आता चित्रपटाची तारीख बदलणार नाही, अशी ठाम भूमिका भन्साळींनी घेतल्यामुळे यशराजला आपला चित्रपट पुढे ढकलावा लागला आहे. एरव्ही कोणापुढेही नमते न घेणाऱ्या यशराज फिल्म्सने भन्साळींचा विरोध पत्करण्यापेक्षा तडजोडीचा मार्ग स्वीकारला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा