यशवंत देव यांची ओळख गायक, गीतकार व संगीतकार एवढीच मर्यादित नाही. गाण्याकडे व जगण्याकडे पहाण्याची एक अनोखी दृष्टी त्यांना लाभली आहे. ८७ वर्षांचा हा प्रतिभावान फसफसत्या उत्साहाने व्यक्त होऊ लागला की आठवणींचा, अनुभवांचा न संपणारा खजिनाच आपल्यासमोर खुला होतो. सांगलीच्या ‘चतन्य मल्टिमीडिया’च्या माध्यमातून हा खजिना लवकरच डिव्हीडीच्या रूपात रसिकांसमोर येत आहे. या निर्मितीचा प्रत्यक्ष वृत्तान्त ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी..
देवांची मुलाखत ही मुलाखत नसतेच, त्या असतात अनौपचारिक गप्पा. गाणं हा तर त्यांच्या आनंदाचा व व्यवसायाचा भाग, मात्र त्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या विषयांवरचे त्यांचे चिंतनशील विचार ऐकणं म्हणजे पर्वणीचं असतं. शब्दप्रधान गायकीचे खंदेसमर्थक असणारे देव मराठी सुगम व चित्रपटसंगीताचा फार मोठा काळ जगले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे बरंच काही आणि वयाच्या या टप्प्यावरही स्मरणशक्ती तल्लख. हा चालताबोलता इतिहास कायमस्वरूपी नोंदला जावा, अशी ऊर्मी ज्यांच्या मनात आली त्या सांगलीच्या डॉ. बाळकृष्ण चतन्य यांनी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्यावरील ‘माझे जीवनगाणे’ या डिव्हीडीनंतर देवांवरील डिव्हीडीचा घाट घातला आहे. या डिव्हीडीचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले.
आकाशवाणीतील नोकरी, त्यापूर्वी सुगम संगीताची घेतलेली शिकवणी, गीतकार-संगीतकार अशी बहरत गेलेली कारकीर्द, ओशोंच्या विचारांची मोहिनी..अशा जवळपास सर्वच विषयांवर देवांनी प्रसिद्ध निवेदक व मुलाखतकार भाऊ मराठे यांच्याशी गप्पा मारल्या. गिरगावमधील देवांची सुगम संगीताची शिकवणी त्या काळी खूपच प्रसिद्ध होती. अगदी सुमन कल्याणपूर यांनीसुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं. देवांकडे मी खूप काही शिकले, असं त्या आजही सांगतात.
या प्रवासाबद्दल देव सांगू लागले, सुमन कल्याणपूर म्हणजे तेव्हाची सुमन हेमाडी, खूपच मितभाषी व अंतर्मूख स्वभावाची. मात्र, तिची गाण्याची समज अफाट. तिला मी गाणं शिकवलं, असं ती म्हणत असली तरी तिला फार मार्गदर्शन करावं लागलं नाही, आवाज तर एवढा गोड की ऐकतच राहावा. लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधम्र्य साधणारा आवाज असूनही तिने कधी त्यांची नक्कल केली नाही. तेव्हा लोकप्रिय असलेली अनेक चित्रपटगीते तिने माझ्याकडून बसवून घेतली होती. लता मंगेशकरांचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो, असा आवाज होणे नाही. त्यांना गाण्याची चाल शिकवावी लागतच नाही. एकदा ऐकल्यानंतर आरशात ज्या सहजतेनं प्रतििबब उमटावं तसं गाणं त्यांच्या गळ्यातून येतं. देवाने म्हणजे वरच्या देवाने विचार करूनच प्रत्येकाला वेगळा आवाज दिला आहे. आकाशवाणीसाठी लता-आशा या बहिणींची गाणी मी साऊंड रेकाँडिस्ट या नात्यानेही ध्वनिमुद्रित केली आहेत. कवी राजा बढे यांनी एक कल्पना मांडली. ‘रंजनी’ नावाच्या कार्यक्रमातून दर महिन्याला तीन नवी गाणी श्रोत्यांसाठी तयार करायची.. यासाठी आम्ही सर्वप्रथम निवड केली ती मंगेशकर भावंडांची. हृदयनाथ यांनी संगीत दिलेली ‘मावळत्या दिनकरा, कशी काळनागिनी’ ही गीते लताबाईंनी तर ‘चांदणे िशपीत जाशी’ हे गीत आशाबाईंनी या कार्यक्रमासाठी ध्वनिमुद्रित केलं, मात्र नेमका साऊंड इंजिनीअर हजर नसल्याने त्याचे काम मला करावे लागले. ध्वनिमुद्रण व गाणी उत्तम झाली, मात्र आमच्या नियोजित कालावधीपेक्षा सहा मिनिटे कमी पडली, आता नवं गाणं कोठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला, सर्व वाटा बंद झाल्यानंतर मीच ज. के. उपाध्ये यांचं एक गीत निवडलं व त्याला स्वरबद्ध केलं. सुधा मल्होत्राने गायलेलं ‘विसरशील खास मला’.. हे ते गीत. ते गीत कमालीचं लोकप्रिय झालं, आशाबाईंनाही ते आवडलं, इतकं की तब्बल १२ वर्षांनंतर त्यांनी ते त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून घेतलं. सुरुवातीला माझी ओळख केवळ संगीतकार अशीच होती, मात्र योगायोगाने मी गीतकार झालो. ‘झालं गेलं विसरून जा’ हा माझा पहिला चित्रपट. त्यावेळी गीतकार कोण, अशी विचारणा मी निर्मात्यांकडे केली. तेव्हा त्यांच्याकडून उत्तर आलं की, आम्हाला पु. ल. देशपांडे यांनी सांगितलं आहे की देवच गाणी लिहितील. झालं, ती जबाबदारीही माझ्यावरच पडली. सुदैवाने मी ती निभावून नेली. त्या चित्रपटातील ‘तू नजरेने हो म्हटले, पण वाचेने वदणार कधी’ हे गीत प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. बाबूजी आणि आशा भोसले यांनी ते गायलं होतं. बाबूजींना चाल शिकवताना माझ्यावर दडपण आलं होतं, मात्र मी त्यावरही मात केली. बाबूजी तेव्हा नेमके दादरला आमच्या शेजारच्या इमारतीत राहायला आले होते. भीड चेपावी म्हणून मी मुद्दाम त्यांच्या बाजूच्या खिडक्या उघडय़ा ठेवून मोठय़ाने गायचो, त्यांनी ते ऐकलं असावं. प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी माझं कौतुक केलं. यानंतर चित्रपट, नाटकं मिळत गेली. आकाशवाणीच्या नोकरीनेही मला समृद्ध केलं. सुरुवातीपासून आध्यात्मिक वृत्ती होतीच, ओशोंमुळे त्यात भर पडली. आता मी खऱ्या अर्थाने कृतकृत्य आहे. शांता शेळके यांचं स्वरबद्ध केलेलं एक गीत मला या वळणावर आठवतंय, ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे’..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा