कोणताही चरित्रपट करताना ज्या व्यक्तिवर तो चित्रपट बेतला आहे त्यांच्यासारखा दिसणारा, त्यांच्याशी काहीअंशी साधम्र्य साधणारा चेहरा शोधणे हे एक मोठे आव्हान असते. ज्यांना सर्वानी पाहिले आहे अशा लोकनेत्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करायचा असेल तर हे आव्हान अधिकच कडवे होते. कारण, तो चेहरा लोकांनी स्वीकारायला हवा आणि किमानपक्षी ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केले असेल अशा मंडळींना तरी तो विश्वासार्ह वाटायला हवा. या दोन्ही गोष्टी जुळून आल्या त्या महाराष्ट्र शासन आणि एस्सेल वर्ल्ड प्रस्तुत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची’या चित्रपटाच्या निमित्ताने. यशवंतरावांचा चेहरा दिग्दर्शक जब्बार पटेल यांना गेली अनेक वर्ष हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अशोक लोखंडेंमध्ये सापडला. आणि एक कलाकार म्हणून अनेक वर्ष सातत्याने काम करत असणाऱ्या अशोक लोखंडे यांनाही थेट यशवंतरावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळाल्याने आनंदच झाला.
अशोक लोखंडेंशी बोलताना पहिल्यांदा यशवंतराव ते हेच या भूमिकेपर्यंत जब्बार आले कसे?, हा मोठा औत्सुक्याचा प्रश्न होता. त्यावर त्यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांच्यावर मराठी चित्रपट तयार केला जात असून त्यांच्या भूमिकेसाठी कलाकारांचा शोध सुरू आहे. तू तुझी छायाचित्रे चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना पाठवून दे, असे माझे लेखक-दिग्दर्शक मित्र शिवदास घोडके आणि अन्य एक मित्र विनोद यांनी सांगितले. मी मुळचा महाराष्ट्रीय असलो तरी गेली अनेक वर्षे हिंदूीतच काम केले असल्याने मराठी चित्रपटात आणि तेही यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेसाठी माझी निवड होईल की नाही याची मला खात्री वाटत नव्हती. त्यामुळे घोडके आणि विनोद यांच्या म्हणण्याकडे सुरुवातीला मी दुर्लक्ष केले. काही दिवसांनी घोडके यांचा मला पुन्हा दूरध्वनी आला आणि माझी छायाचित्रे मी जब्बार पटेल यांच्याकडे पाठविली. त्यांनी ती छायाचित्रे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना पाठविली. मला ऑडिशन आणि स्क्रिन टेस्टसाठी बोलावण्यात आले. मीही भूमिकेसाठी आवश्यक ती वेशभुषा आणि रंगभूषा करून परिक्षा दिली. तेव्हा डॉ. जब्बार पटेल आणि विक्रम गायकवाड यांना माझ्यात ‘यशवंतराव चव्हाण’ दिसले. त्यांनी या भूमिकेसाठी माझी निवड केली, माझ्यावर विश्वास टाकला हे महत्वाचे होते, असे लोखंडे यांनी सांगितले. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएसडी) विद्यार्थी असलेले अशोक लोखंडे यांनी या अगोदर ‘खामोशी’, ‘जस्ट मोहब्बत’, ‘सरफरोश’ हे चित्रपट तसेच ‘चाणक्य’, ‘मृगनयनी’, ‘सोनपरी’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकांमध्ये विविध भूमिका केल्या. अमोल पालेकर यांचे ‘पगला घोडा हे मराठी नाटकही त्यांनी केले आहे. मराठीतील हे त्यांचे पहिले पदार्पण आहे. ‘ही भूमिका करताना एक कलाकार म्हणून माझा कस तर लागलाच पण ‘यशवंतराव चव्हाण’ म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते आणि संपूर्ण महाराष्ट्र यांना मी ‘आपला’ वाटेन की नाही याचे दडपण आणि उत्सुकताही माझ्या मनात आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील चित्रपटात मला त्यांचीच भूमिका करण्याची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. या चित्रपटाद्वारे मला ही संधी मिळाली. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व साकारण्याचा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला आहे.. अशोक लोखंडे खूप भारावून आणि भरभरून बोलत होते.
हा चित्रपट महाराष्ट्र आणि देशातील एका मोठय़ा नेत्याच्या जीवनावर असून त्याचे कुठे दडपण आले नाही का? असे विचारले असता लोखंडे म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे, हे अभिनेत्यांपुढे आव्हान असते. एक अभिनेता म्हणून कुठेही कमी न पडता ‘यशवंतराव चव्हाण’ साकारण्याचा माझ्याकडून मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अर्थात, यशवंतराव चव्हाण यांना जवळून पाहिलेले, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम केलेले अनेकजण आज हयात आहेत. त्यामुळे थोडे दडपण जास्त वाटत असल्याचेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2014 रोजी प्रकाशित
यशवंतराव
कोणताही चरित्रपट करताना ज्या व्यक्तिवर तो चित्रपट बेतला आहे त्यांच्यासारखा दिसणारा, त्यांच्याशी काहीअंशी साधम्र्य साधणारा चेहरा शोधणे हे एक मोठे आव्हान असते.

First published on: 09-03-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwantrao