महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला ‘यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चित्रपट प्रदर्शित करून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात असल्याची टीकाही विरोधकांकडून करण्यात येत आहे. पण चित्रपट म्हणावा तितका प्रभावी न झाल्याने त्याचा किती लाभ दोन्ही काँग्रेसला होईल की नाही हे बाजूलाच राहिले. पण ज्या नव्या पिढीला यशवंतरावांची ओळख व्हावी म्हणून हा चित्रपट केला त्यांच्यापर्यंत तरी तो पोहोचला का? हा खरा प्रश्न आहे.
आजवर मराठीत जे जे राजकीय आणि सामाजिक नेत्यांवर चित्रपट किंवा चरित्रपट तयार झाले त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली असल्याचेच चित्र दिसून येते. पण त्याच वेळी राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या चित्रपटांवर मात्र प्रेक्षकांनी नेहमीच आपल्या पसंतीची मोहोर उमटविलेली पाहायला मिळते. राजकीय नेते किंवा समाजसुधारक यांच्यावरील चरित्रपटाची निर्मिती ही काही नवीन गोष्ट नाही. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आचार्य अत्रे यांनी १९५५ मध्ये ‘महात्मा फुले’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. मराठीमधील गेल्या काही वर्षांतील अशा राजकीय चरित्रपटांचा धावता आढावा घेतला तर हुतात्मा चाफेकर बंधू यांच्या जीवनावर तयार झालेला ‘२२ जून १८९७’ , स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘हुतात्मा राजगुरू’, संततिनियमनाचा प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या जीवनावरील ‘ध्यासपर्व’ आदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच चरित्रपट तयार झाले आहेत. यापैकी बहुतेक चित्रपट हे शासकीय अनुदानावर किंवा लोकांकडून निधी जमा करून त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र यापैकी कोणताच चित्रपट खूप चालला, चित्रपटाने गल्ला जमविला किंवा सर्वसामान्य प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला असे झाले नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवडे ते चालले आणि नंतर प्रेक्षकांच्या विस्मरणात गेले.
राजकीय नेते आणि समाजसुधारकांवर चित्रपट तयार करताना तो वास्तववादी असणे, जी व्यक्तिरेखा पडद्यावर दाखवायची आहे, त्याच्याशी साधम्र्य असणाऱ्या अभिनेत्याची निवड, त्या वेळचा संपूर्ण काळ उभा करणे, इतिहासाचा विपर्यास न करता, एकांगी न वाटता, तो सादर करणे या गोष्टीला खूप महत्त्व असते. तो नुसताच माहितीपट होणार नाही याबरोबरच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, चित्रपटाची लांबी याचीही काळजी घ्यावी लागते. प्रेक्षकांना चित्रपटात ‘नाटय़’ हवे असते. नाटय़मयता आणि वास्तवता यांचे गणित जमले तर तो चरित्रपट व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी होतो. तसेच एखाद्या राजकीय व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचे लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यामुळे अमुक एक व्यक्ती एखाद्या समूहाला आपलीशी वाटली तरी तीच व्यक्ती अनेकांना परकी वाटू शकते. त्यांचे विचार, तत्त्वज्ञान हे न पटणारे असू शकते. त्यामुळे असा चित्रपट संपूर्ण समाजाकडून पाहिला जात नाही आणि म्हणूनच तो चित्रपट चालला नाही, असे म्हटले जाते. अशा राजकीय नेत्यांचे विचार न पटणाऱ्या गटालाही कळावेत आणि त्यांनी ते व्यक्तिमत्त्व समजून घ्यावे, म्हणूनच खरे तर असे चित्रपट तयार होतात. पण बहुसंख्य प्रेक्षकांनी अशा चित्रपटांना उत्साहवर्धक प्रतिसाद दिला नाही, असेच दुर्दैवाने पहायला मिळते.  चरित्रपटांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद इतका कमी असताना राजकीय पाश्र्वभूमी असलेले चित्रपट मात्र व्यावसायिकदृष्टय़ा अत्यंत यशस्वी झाल्याचे विरोधी चित्र दिसून येते. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘सरकारनामा’, ‘वजीर’, ‘झेंडा’ असे वेगवेगळे राजकीय-सामाजिक आशयाचे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत. आपल्या आजूबाजूला जे काही राजकारण चालते, राजकीय घटना घडतात, प्रसारमाध्यमातून जे समोर येते, राजकारण या विषयावर खमंग चर्चा करता येते, असेच चित्रपट प्रेक्षक स्वीकारतात, असे म्हणावे लागेल. पण त्याच वेळी देश आणि समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या वास्तवातील या ‘नायका’कडे आपण पाठ फिरवितो.
चित्रपट म्हणजे केवळ दोन घटका करमणूक अशी आपल्याकडील सर्वसामान्य प्रेक्षकांची समजूत आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, स्पर्धा, दु:ख, विवंचना विसरण्याचे माध्यम म्हणून प्रेक्षक चित्रपटांकडे पाहतो आणि नीतिमत्ता, मूल्ये, तत्त्व, आदर्श या गोष्टी त्याला पटत असल्या तरी त्या स्वीकारणे आणि आचरणात आणणे, हे सर्वसामान्य माणसाला तसे पचनी पडणे कठीण जाते. त्या चरित्रपटाचे निर्मितीमूल्य आणि गुणवत्ता, याचाही विचार प्रेक्षक करतोच करतो. केवळ अनुदान मिळते म्हणून चित्रपट निर्मिती करणे, अशा चित्रपटातून ‘त्या’ नेत्यापेक्षा स्वत:ला मोठे करण्याच्या अट्टहासातून चित्रपटाचा ढासळलेला दर्जा, त्याची वाढलेली लांबी, रटाळपणा, तो चरित्रपट न वाटता त्याचा झालेला माहितीपट आदी कारणांमुळे प्रेक्षकांनी अशा चरित्रपटांकडे पाठ वळविली तर तो दोष कोणाचा? प्रेक्षकांचा की..

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
Story img Loader