सुप्रसिद्ध आणि कर्तृत्ववान व्यक्तींचे कार्य आणि कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने चरित्रपट केले जातात. अलीकडच्या काळात मिल्खा सिंग, सिंधुताई सपकाळ आणि यापूर्वी महात्मा गांधी, सरदार पटेल यांसारख्या उत्तुंग व्यक्तींवरचे चरित्रपट चांगलेच गाजले आहेत. चरित्रपट हा चित्रपट प्रकार प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग राजकीय व्यक्तीवरचा चित्रपट आणि तोही डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या दिग्दर्शकाने केला आहे म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये निश्चितच उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरतो. दस्तावेजीकरण म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील घटनांचा उत्कृष्ट माहितीपट म्हणता येईल. परंतु चित्रपट म्हटल्यावर असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात दिग्दर्शक अयशस्वी ठरले आहेत. ही बखर विस्कळीतपणे पडद्यावर साकारते. त्यामुळे ती अपेक्षित परिणाम साधू शकत नाही.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, नंतरच्या काळात पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात भूषविलेले संरक्षण मंत्रिपद व अन्य मंत्रिपदे यामुळे यशवंतराव चव्हाण यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द रुपेरी पडद्यावर मांडणे हे निश्चितच आव्हानात्मक होते. मात्र हे आव्हान पेलण्यात चित्रपटकर्ते मर्यादित स्वरूपातच यशस्वी ठरले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या बालपणापासून ते संपूर्ण राजकीय कारकिर्दीपर्यंतचा पट एकाच वेळी सूत्रधार, शाहीर निवेदक आणि नाटय़रूपांतरण अशा तीन पातळ्यांवर उलगडत जातो. चित्रपटाची सुरुवात प्रा. देशमुख यांच्याकडे दोन विद्यार्थी यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येतात अशी होते. दोन्ही विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा विषय म्हणून ते यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्यासाठी प्रा. देशमुख यांचे मार्गदर्शन घेताना दाखविले आहे. तिथून लगेच चित्रपट यशवंतराव चव्हाण यांच्या बालपणातील उलथापालथ दाखविण्याकडे वळतो. एकीकडे सूत्रधार म्हणून प्रा. देशमुखांना दाखविल्यानंतर पुढे शाहीर निवेदक पोवाडय़ातून यशवंतराव चव्हाणांचा पुढचा प्रवास उलगडतो आणि मग त्यांच्या आयुष्यातील संघर्ष व घटनाक्रम उलगडताना दाखविले आहे. चित्रपटकर्त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे जीवन, त्यांनी घेतलेले राजकीय निर्णय, त्यांची रसिकप्रियता, त्यांचा स्वभाव, त्यांचे कौटुंबिक जीवन असे भरपूर पैलू दाखविण्याचा मोह झाला आहे. मध्येच नाटय़ रूपांतरण, मध्येच संग्रहित कृष्णधवल दृश्ये, मध्येमध्ये गाण्यांचा भडिमार, भरपूर व्हिज्युअल्स पडद्यावर भराभर येत राहतात. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, त्यांचे गुणविशेष, राजकीय निर्णयक्षमता, त्यांचे यश, त्यांनी जिंकलेल्या निवडणुका, त्यांनी केलेला संघर्ष असे एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वात दडलेले अनेक पैलू चित्रपट पाहताना प्रेक्षकाला नीट समजत नाहीत. प्रेक्षक गोंधळतो. संयुक्त महाराष्ट्राचा लढा दाखविताना आचार्य अत्रे यांचे भाषण दाखविले आहे ते सयुक्तिक वाटते. परंतु श्यामची आई हे पुस्तक आणि चित्रपटातून अत्रेंच्या विषयी यशवंतराव चव्हाण यांच्या मनात आदरभाव उत्पन्न झाला हे नाटय़ रूपांतरणातून सांगत असताना श्यामची आई चित्रपटातील दृश्ये पडद्यावर दाखविणे आवश्यक होते का, असा प्रश्न प्रेक्षकाला पडतो. साहित्य, कला यांत यशवंतराव चव्हाण यांना खूप रस होता, ते कलावंतांचा प्रचंड आदर करायचे हे अनेक चित्रफितींमधून दाखविले आहे. त्याचबरोबर पंडित नेहरू यांनी बोलावल्यानंतर केंद्र सरकारमध्ये विविध मंत्रिपदे भूषविताना त्यांनी केलेली उत्तुंग कामगिरी दाखविण्यावर खूप भर दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय, राज्याच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान, दूरदर्शीपणा, सहकार चळवळीची उभारणी, शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय, त्याचे राज्याच्या पुढील वाटचालीवर झालेले दूरगामी परिणाम हा भाग अजिबात दाखविलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकाला राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे कार्य आणि कर्तृत्व समजावून घेता आलेले नाही.
यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वेणूताई यांच्या विवाहानंतर आलेले एखादे गाणे सोडले तर अन्य सर्व गाण्यांचा भडिमार अंगावर येतो. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य आणि कर्तृत्व, त्यांचा दूरदर्शीपणा यामुळे झाकोळला गेला आहे, एकसंध परिणाम करण्यात चित्रपट अयशस्वी ठरतो. अशोक लोखंडे यांनी साकारलेले यशवंतराव चव्हाण, सुप्रिया विनोद यांनी साकारलेल्या इंदिरा गांधी या भूमिका लक्षात राहतात.
यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची
निर्माता – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
दिग्दर्शक – डॉ. जब्बार पटेल
लेखक – अरुण साधू
छायालेखन – सय्यद लायक अली
संकलन – नितीन रोकडे
कलावंत – अशोक लोखंडे, लुब्ना सलीम, सतीश आळेकर, मीना नाईक, वैशाली दाभाडे, सुप्रिया विनोद, रेखा कामत, ओम भूतकर, बेंजामिन गिलानी, राहुल सोलापूरकर व अन्य.

Story img Loader