सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार लग्न करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री यामी गौतमने ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केल्याचे समोर आले. आता तिच्या पाठोपाठ ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्माने लग्न केल्याचे समोर आले आहे. एवलिनने १५ मे रोजी लग्न केले आहे. आता तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.

एवलिनने बॉयफ्रेंड तुशान भिंडीशी लग्न केले आहे. तो ऑस्ट्रेलियात राहत असून एक डॉक्टर आहे. १५ मे रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्न केले. २०१९मध्ये एवलिन आणि तुशानने साखरपुडा केला होता. एवलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ब्रायडल लूकमध्ये सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘फॉरएव्हर’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबंधनात; जाणून घ्या तिच्या पती विषयी

लग्नाविषयी बोलताना एवलिन म्हणाली, ‘तुमच्या सर्वात जवळच्या मित्राशी लग्न करणे या पेक्षा कोणतीही चांगली गोष्ट असू शकत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

तुशानने एवलिनला सिडनीमधील हार्बर ब्रीजवर प्रपोज केले होते. एवलिनला खूश करण्यासाठी एक खास नोट देखील लिहिली होती. एवलिनने स्वत: याबाबत खुलासा केला होता. तुशान हा ऑस्ट्रीलियामध्ये राहणारा आहे. तो एक डेंटल सर्जन आहे.