Year Ender 2024: २०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. या वर्षात मनोरंजनविश्वात अनेक घडामोडी घडल्या. ज्यामुळे खळबळ उडाली. तसंच बऱ्याच गोष्टी घडल्या; ज्या अभिमानस्पद होत्या. आता २०२५ या नवीन वर्षात पाऊल ठेवण्यापूर्वी थोडं मागे वळून पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण २०२४मध्ये मनोरंजनविश्वातल्या टॉप-११ बातम्या जाणून घेऊयात…
‘मुंज्या’, ‘स्त्री २’ने लावलं वेड, तर वर्षा अखेरीस ‘पुष्पा २’चा धुमाकूळ
यंदा विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांनी अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत, बक्कळ कमाई केली. या चित्रपटातील गाणी, पात्रांनी प्रेक्षकांना वेड लावलं. ‘मुंज्या’, ‘स्त्री २’, ‘कल्कि २८९८ एडी’, ‘पुष्पा २: द रुल’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवलं. तसंच ‘स्त्री २’, ‘कल्कि २८९८ एडी’, ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटांनी ५०० कोटींहून अधिक कमाई केली. तसंच मराठी सिनेसृष्टीतील ‘जुनं फर्निचर’, ‘नाच गं घुमा’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘धर्मवीर २’, ‘घरत गणपती’ यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. तर दाक्षिणात्यमध्ये ‘देवरा’, ‘हनुमान’, ‘अरमान’ या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिकली.
अभिनय सम्राटचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव
२०२४च्या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आलं. अशोक सराफ म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. गेल्या ४ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवत आहेत. कधी विनोदी, कधी गंभीर, तर कधी खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारून अशोक सराफ अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचं नाव अत्यंत अदबीने घेतलं जातं. २३ फेब्रुवारीला महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ हा अशोक सराफांना प्रदान करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर यांच्या हस्ते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला गेला होता.
बहुचर्चित अनंत अंबानीचं लग्न
२०२४मधील बहुचर्चित लग्न म्हणजे मुकेश अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानीचं लग्न. १२ जुलैला अनंत अंबानी लग्नबंधनात अडकला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा मोठा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी दोन प्री-वेडिंग सोहळे झाले. मार्च महिन्यात तीन दिवसांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये पार पडला. त्यानंतर २९ मे ते १ जूनपर्यंत दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर झाला. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा झाला. हे दोन्ही प्री-वेडिंग सोहळे चांगलेच गाजले. या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जगप्रसिद्ध गायक-गायिका, रिहाना, अॅकॉन, जस्टिन बीबर, कॅटी पेरी यांचे परफॉर्मन्स ठेवण्यात आले होते. यासाठी मुकेश अंबानींनी कोट्यावधी पैसे मोजले. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.
ऑस्करमध्ये जॉन सीनाची नग्नावस्थेत एन्ट्री
९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा ११ मार्चला पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये २०२४मधील ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ऑस्कर सोहळा हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा मानला जातो. या सोहळ्यात एक वेगळी घटना घडली. या सोहळ्याचं सूत्रसंचालनाची जबाबदारी जिमी किमेलनेवर होती. यावेळी जिमी किमेलने एका जुन्या ऑस्कर सोहळ्यातील आठवणींना उजाळा देत असताना, तेव्हा अचानक मागून जॉन सीना नग्नावस्थेत आला होता.
जिमी किमेलने जुन्या ऑस्कर सोहळ्यात पुरस्कार सादर करताना एक नग्न माणूस मंचावर धावत आला होता. आज अगदी त्याचप्रमाणे एक व्यक्ती येईल, असं जिमीने उपस्थितांना म्हणताच जॉन सीनाने नग्नावस्थेत एन्ट्री घेतली होती. कॉस्च्युम डिझाइनरसाठी पुरस्कार देण्यासाठी जॉन सीना कपडे न घालता फक्त हातात एक लिफाफा घेऊन पोहोचला होता. जॉन सीनाचा या लूकमध्ये पाहून उपस्थितांना हसू अनावर झाले. जॉन सीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर १४ एप्रिल रोजी दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. तसेच अभिनेत्याचे लाखो चाहते सुद्धा चिंतेत होते. तेव्हापासून सलमान खानबरोबर पोलीस संरक्षण दिसतं आहे. या प्रकरणात ४८ तासांच्या आत विकी गुप्ता ( वय २४) आणि सागर पाल ( वय २१) यांना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३२ वर्षी अनुज थापनचा पंजाबमधून गजाआड केलं.
काही दिवसांनी अनुज थापनने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचं समोर आलं. पण याप्रकरणी अनुजच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करून त्याच्या आईने प्रकरणाची सीबीआयच्या चौकशीची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने अनुज थापन याचा मृत्यू कोठडीतील पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे दिसून येत नाही, असं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाचा संदर्भ देताना स्पष्ट केलं.
मराठमोळ्या छाया कदम यांचा जलावा
छाया कदम यांच्यासाठी २०२४ वर्ष खूपच खास होतं. कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ चित्रपटातील त्यांच्या कामाच्या कौतुकानंतर ‘लापता लेडीज’मुळे त्या अधिकच चर्चेत आल्या. किरण राव दिग्दर्शित या चित्रपटात छाया यांनी मंजू माईची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. यंदा छाया कदम यांच्या नावाचा जगभरात ढंका होता, असं म्हणायला काही वावग ठरणार नाही.
पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटानिमित्ताने छाया कदम यांनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’ गाजवलं. आई साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करून छाया कदम कान फेस्टिव्हलला गेला होत्या. या मानाच्या फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या कामाचं भरभरून कौतुक करण्यात आलं. त्यानंतर छाया कदम बऱ्याच नामांकित फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळाल्या. त्यांच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटासाठी निवड ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झाली होती.
गोविंदा गोळीबार प्रकरण
अभिनेता गोविंदाला १ ऑक्टोबरला त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागली. त्यामुळे तात्काळ त्याला मुंबईतला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे गोविंदाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. गोविंदाचा मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामधील एका कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. सकाळी ६ वाजताचं विमान होतं. त्यामुळे सर्व काही आवरून गोविंदा कपाटात बंदूक ठेवत होता. तेव्हा ती खाली पडली आणि मिसफायर झाली. यामुळे गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा धुरळा
यंदाचं ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलं गाजलं. चौथ्या पर्वानंतर जवळपास दोन वर्षांनी ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व पाहायला मिळालं. या पर्वात ‘कॅप्टन ऑफ द शिफ’ म्हणजेच होस्ट म्हणून लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख पाहायला मिळाला. त्याने आपल्या दमदार शैलीत या पर्वातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. तसंच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धकांनी आपल्या जबरदस्ती खेळीने हे पर्व आणखी रंगदार केलं. या पर्वात कलाकारांसह सोशल मीडियावरील स्टार्स झळकले होते.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासून वाद पाहायला मिळाले. वर्षा उसगांवकर, निखिल दामले, अंकिता प्रभू-वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, पुरुषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज पवार आणि अभिजीत सावंत हे १६ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यानंतर संग्राम चौघुले वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाला. ७० दिवसांच्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. सर्वाधिक टीआरपी ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाला मिळत होता. अखेर ६ ऑक्टोबरला या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि सूरज चव्हाणला विजयी घोषित केलं. तर अभिजीत सावंत उपविजेता झाला.
ए.आर. रेहमान घटस्फोट
संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक संगीतकार आणि ऑस्कर विजेते ए.आर. रेहमान यांनी नोव्हेंबर महिन्यांत विभक्त होणार असल्याची घोषणा केली. २९ वर्षांचा सायरा बानू यांच्याबरोबरचा त्यांचा संसार मोडला. ए.आर. रेहमान आणि सायरा बानू यांच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत एक निवेदन जारी केलं होतं. यामध्ये लिहिलं होतं की, हा निर्णय त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर घेण्यात आला आहे. या जोडप्याचं एकमेकांवर प्रेम असूनही त्यांच्या नात्यात तणाव व अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी कोणालाही दूर करता येणार नाहीत असं सायरा यांनी सांगितलं. त्यामुळे दोघांनी एकमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण, या निवेदनानंतर ए.आर. रेहमान यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता.
दाक्षिणात्य सुपरस्टार्समध्ये टोकाचे वाद
धनुष आणि नयनतारा हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय नावं आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद असल्याचं समोर आलं होतं. या वादावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघं एकमेकांवर टीका करताना दिसले. या वादाचं कारण नयनताराची डॉक्युमेंटरी ‘नयनतारा: बियॉन्ड द फेअरटेल’ होती. या डॉक्युमेंटरीमध्ये ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाचा तीन सेकंदांचा बिहाइंड द सीन्सचा व्हिडीओ वापरल्यावरून धनुषने १० कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली. धनुष हा ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाचा निर्माता होता.
नयनताराच्या मते, या चित्रपटातील दृश्यांचा वापर करण्यासाठी धनुषकडे ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) मागण्यासाठी तिच्या टीमने दोन वर्षांमध्ये खूप वेळा प्रयत्न केले होते. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे नयनताराने तिच्या पर्सनल डिव्हाईसवर शूट करण्यात आलेला या सिनेमाचा एक लहान बिहाइंड द सीन्स व्हिडीओ वापरण्याचा निर्णय घेतला. नयनताराच्या आयुष्यात ‘नानुम राऊडी धान’ चित्रपटाचे खास महत्त्व आहे, कारण याच चित्रपटाच्या सेटवर ती तिचा पती विग्नेश शिवनला पहिल्यांदा भेटली होती.
भारताचं ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न हुकलं
९७व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२५) भारताकडून किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाची निवड करण्यात आली होती. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ( विदेशी ) चित्रपट श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताकडून पाठवण्यात आला होता. फिल्म फेडरेशनकडून ‘लापता लेडीज’सह एकूण २९ चित्रपट पाठवण्यात आले होते. यात रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’, कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’, प्रभासचा ‘कल्कि २८९८ एडी’, मल्याळम चित्रपट ‘आट्टम’, राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ या २९ चित्रपटांमधून ‘लापता लेडीज’ची निवड समितीने केली होती. पण, या कॅटगेरीत सिलेक्ट करण्यात आलेल्या १५ चित्रपटांच्या यादीत ‘लापजा लेडीज’ला स्थान मिळवू शकला नाही. त्यामुळे किरण रावचा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आणि भारताला ऑस्कर मिळण्याची आशा संपली.
दाक्षिणात्य सुपरस्टारला जेलची हवा
४ डिसेंबरला हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात ‘पुष्पा २: द रुल’च्या ( Pushpa 2 ) प्रिमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा जखमी झाला. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने एफआयआर दाखल केलं; ज्यामुळे अल्लू अर्जुनला १३ डिसेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर तेलंगणा हायकोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला. एक रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेता १४ डिसेंबरला सकाळी तुरुंगातून बाहेर पडला. मग अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी अल्लूच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. अजूनही या चेंगराचेंगरीच्या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे.