२०२४ या वर्षात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मनोरंजन विश्वात अनेक नवीन चित्रपट, वेब सीरिज, मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले; तर काहींचे घटस्फोट झाल्याचेदेखील दिसले. त्याबरोबरच अनेक लोकप्रिय कलाकारांनी जगाचा निरोपही घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वासह चाहत्यांनीदेखील हळहळ व्यक्त केल्याचे दिसले. अतुल परचुरे, विकास सेठी, कविता चौधरी, नितीश चौहान ते डॉली सोही अशा कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. तर मग ज्या कलाकारांचे या वर्षात निधन झाले त्यांच्याविषयी चला जाणून घेऊयात…

सुहानी भटनागर

‘दंगल’ या गाजलेल्या चित्रपटात लहानपणीची बबिता साकारणारी अभिनेत्री म्हणजे सुहानी भटनागर होय. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. १६ फेब्रुवारी २०२४ ला या अभिनेत्रीचे निधन झाले. अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शरीरात अतिरिक्त द्रव जमा झाल्याने तिचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. सुहानीच्या आकस्मिक निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली.

विकास सेठी

क्योंकि सांस भी कभी बहू थी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते विकास सेठी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले. ८ सप्टेंबर २०२४ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने कलाविश्वात अनेकांना धक्का बसला होता. २००० च्या दशकात त्यांनी अनेक मालिकांत काम करीत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.

ऋतुराज सिंह

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अशी ऋतुराज सिंह यांची ओळख होती. बनेगी अपनी बात, घर एक मंदिर, अनुपमा अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात नकारात्मक भूमिका साकारल्या. टीव्ही मालिकांबरोबरच त्यांनी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येदेखील काम केले. या वर्षाच्या सुरुवातीला २० फेब्रुवारी २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

अतुल परचुरे

‘नवरा माझा नवसाचा’, ‘बिल्लू’, ‘यकीन’, ‘आम्ही सातपुते’, ‘सून लाडकी सासरची’ आणि २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ अशा अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अतुल परचुरे होय. अतुल परचुरेंचे १४ ऑक्टोबर २०२४ ला निधन झाले. दीर्घकाळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

नितीन चौहान

‘क्राइम पेट्रोल’ व ‘स्प्लिट्सव्हिला’ अशा शोंमध्ये काम करणाऱ्या अभिनेता नितीन चौहानने वयाच्या ३५ व्या वर्षी ६ नोव्हेंबर २०२४ ला जगाचा निरोप घेतला. त्याने स्वत:च्याच घरात गळफास घेतल्याचे समोर आले होते. गेल्या काही वर्षांपासून तो नैराश्याचा सामना करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरा यार हूँ मैं’ या मालिकेत तो शेवटचा दिसला होता. त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे.

डॉली सोही

‘झनक’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसणारी अभिनेत्री डॉली सोहीचेदेखील या वर्षी निधन झाले. सर्व्हिकल कॅन्सरबरोबर लढा देणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या ४८ व्या वर्षी ८ मार्च २०२४ ला निधन झाले. त्याबरोबरच डॉली सोहीची बहीण अमनदीप सोही हिचेही कावीळ झाल्यामुळे निधन झाले. दोघींचे ४८ तासांच्या अंतराने निधन झाल्याचे समोर आले होते.

हेही वाचा: तीन पिढ्या जेव्हा एकत्र येतात; ऐश्वर्या राय बच्चनचा आई अन् लेकीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

कविता चौधरी

‘उडान’ या लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री कविता चौधरी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

याबरोबरच, झाकीर हुसैन , कुमार साहनी, रोहित बल, पंकज उधास या लोकप्रिय कलाकारांनीदेखील २०२४ मध्ये जगाचा निरोप घेतला.

Story img Loader