पंकज भोसले

‘आमच्या काळातले संगीत’ हा गेल्या शतकातील दरएक पिढीसाठी अस्तित्व-अस्मिता-अभिमानाचा मुद्दा होता. तबकडी चालणाऱ्या रेकॉर्ड प्लेअरची निर्मिती थांबल्यावर ‘आम्ही ऐकतोच तेच अरभाट आणि बाकी सारे चिल्लर’ युगाचा अस्तारंभ झाला. कॅसेटपर्वाच्या दोन-तीन दशकांत गाण्यांतून मेलडी हद्दपार झाल्याची आवई उठली. काही अपवाद सोडला तर सीडीपासून पेनड्राइव्हपर्यंत हलक्या-फुलक्या गाण्यांची साथसंगत आपल्या अगदीच हलक्या बनलेल्या आयुष्याला पुरून उरली. तरीही संगीत ऐकणाऱ्या दरएक पिढीतील निवडकांची ‘बिटल्स’ या ब्रिटिश बॅण्डबाबत सं-मोहिनी उतरली नाही. या बॅण्डने ‘येशूख्रिस्ताहून थोर आम्ही’ हा १९६६ साली केलेला गजर आजही खरा ठरतोय, ते त्यांच्या गाण्यांतील, प्रतिभेतील स्फूर्तीतत्त्व आजच्या कलाकृतींमध्ये अव्याहत सांडलेले दिसत असल्यामुळे. ‘बिटल्स’ नसते तर आपल्याकडच्या हिंदी सिनेमांतील कित्येक तथाकथित पंचम-पंडितांचे सांगीतिक प्रयोग कानांमध्ये झिरपले नसते, हॉलीवूडमधील कित्येक प्रेमकथांना इंधन मिळाले नसते आणि जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या कित्येक कादंबऱ्यांमधील नायक प्रेरणाहीन भासले असते.अज्ञात प्रकाशवर्षे दूर असलेल्या कुणा परग्रहवासीयांनाही या पृथ्वीतलावरचे कुठले गाणे ऐकू गेले असेल, तर ते बिटल्सचेच असेल. कारण नासाने दहा वर्षांपूर्वी अंतराळात बिटल्सचे ‘अ‍ॅक्रॉस द युनिव्हर्स’ हे गाणे प्रक्षेपित केले होते. (गंमत म्हणजे त्यातील ‘जय गुरू देवा’ या शब्दांनी भारावून जाण्याची अवस्था कित्येक कडव्या भारतीय गानरसिकांना या गाण्याविषयीच्या अनभिज्ञतेमुळे अद्याप लाभली नसेल.) ‘बिटल्स नसते तर’च्या यादीचा (फापट)पसारा अनंतकाळ वाढवता येण्याइतपत मासले असले, तरी या लेखापुरता ‘यस्टर्डे’ या ताज्या सिनेमापाशी त्या यादीचा समारोप करता येईल.

ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी ‘स्लमडॉग मिलिऑनेर’च्या अभूतपूर्व यशाआधी आणि नंतर जे काही चित्रपट केले आहेत, त्यासाठी निवडलेली गाणी हा अखंड चर्चेचा विषय ठरू शकतो. ‘ट्रेनस्पॉटिंग’मधील अण्डरवर्ल्ड बॅण्डचे बॉर्न स्लीपी, वुल्फ अ‍ॅलिसचे सिल्क, ‘द बीच’ सिनेमामधील डॅरिओ जी बॅण्डचे ‘व्हॉयसेस’, ‘लाइफ लेस ऑर्डिनरी’ चित्रपटातील फेथलेस बॅण्डचे डोण्ट लिव्ह आणि ‘ट्रान्स’मधील ‘हिअर इट कम्स’ ही गाणी त्या त्या चित्रपटाच्या विषयांत चहातील अचूक प्रमाणातील साखरेसारखी विरघळली आहेत. त्याच्या चित्रपटांतील सांगीतिक क्षण मनावर नेहमी गोंदविले जातात. तर आजच्या लोकप्रिय संस्कृतीमधील संगीत भान आणि जाण उत्तम असलेल्या या दिग्दर्शकाने बिटल्स बॅण्डच्या ‘यस्टर्र्डे’ या प्रसिद्ध गाण्यावरून प्रेरित होऊन ‘बिटल्स आज अवतरले असते तर’ या संकल्पनेचा कथाविस्तार करणारा चित्रपट बनवला आहे.

बॉयलच्या ‘यस्टर्डे’चा आरंभ होतो तो लोव्हेस्टॉफ्ट या ब्रिटिश शहरगावातील जॅक मलिक (हिमेश पटेल) या भणंग संगीतकारापासून. भारतीय वंशाच्या ब्रिटिश कुटुंबात बऱ्यापैकी शिकला-सवरलेला हा तरुण स्वरचित गीतांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो. म्युझिक फेस्टिव्हल्स, शॉपिंग मॉल, हॉटेल आणि रस्त्यांवर निवडक श्रोतृवर्ग देखील त्याच्या गाण्यांना दाद देण्यासाठी लाभत नाही. एली (लिली जेम्स) ही लहानपणापासून प्रोत्साहन देत असलेली मैत्रीणच त्याच्या पाठीशी कायम उभी असते. गानस्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने शिक्षकीपेशा सोडून कमी वेळ घेणाऱ्या सटर-फटर नोकऱ्या पत्करलेल्या असतात. बारा सेकंदांच्या जागतिक वीज बंद सोहळ्याच्या दरम्यान त्याचा अपघात होतो. दोन दात आणि काही हाडांवर निभावलेल्या या अपघातातून सावरल्यानंतर त्याला भवतालच्या जगातून काही गोष्टी पूर्णपणे पुसल्या गेल्याचा शोध लागतो. कोका-कोला, सिगारेट्स या गोष्टी जगाला माहिती नसतात त्याचे त्याला फारसे काही वाटत नाही. पण अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियाच्या सर्व खंडांमधील-राष्ट्रांमधील नागरिकांच्या मेंदूतून ‘बीटल्स’ या सर्वाधिक लोकप्रिय संगीत बॅण्डची स्मृतीच नष्ट झाली असल्यामुळे या जगाचे काही तरी बिनसले असल्याचे त्याला जाणवायला लागते. मित्र-मैत्रिणींसमोर तो ‘यस्टर्डे’ गाणे वाजवून हे बिटल्सचे असल्याचे सांगतो, तेव्हा त्याला ते ‘बिटल्स कोण?’ असा प्रश्न विचारतात. त्याच्या खासगी संग्रहातून बिटल्सच्या एकूण एक रेकॉर्डस गायब झालेल्या असतात. गूगल विद्यापीठाच्या माहिती कोषात बिटल्स या नावाने संगीत बॅण्ड म्हणून कोणतीही नोंद नसते. त्यांचे कुठलेही गाणे यूटय़ूब अथवा कुठल्या संकेतस्थळावर उपलब्ध नसते. जॅक मलिक मग बिटल्सची आठवतील ती सगळी गाणी आपल्या नावाने प्रकाशित करायला सुरुवात करतो. या गाण्यांमुळे अभूतपूर्व प्रसिद्धी त्याला लाभते आणि गानसम्राट होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल व्हायला लागते.

गॅझेट्स आणि इतर व्यवधानांमुळे संगीतासह कुठल्याही कलेकडे पाहण्याची समाजाची बनत चाललेली कमअस्सल जाणीव, लोकप्रिय होण्यासाठी गुणवत्तेपेक्षा वेगळ्याच गोष्टींची असलेली आवश्यकता, आनंद आणि यश यांतील फरक, आजच्या काळातील संगीताचे बाजारीकरण आणि कलाकाराची प्रसिद्धी होण्यासाठीचे बदललेले सोपे अन् अवघड मार्ग अशा अनेक मुद्दय़ांवर बॉयलच्या सिनेमात गमतीशीर चर्चा आहे. इथे पारंपरिक वळणाची प्रेमकथाही आहे. त्यात गुंतता-गुंतता आजच्या काळातही बिटल्सची गाणी कशी लोकप्रिय ठरली असती, हे दर्शविणाऱ्या बाबी आहेत.

जॅकचे आपल्या आई-वडिलांना पहिल्या गाण्यातील पहिले शब्द ऐकवताना येणारे व्यत्यय, गाणी ऐकून साक्षात प्रसिद्ध गायक एड शिरन घरी आल्याचे अप्रूप सोडून जॅकचे वडील स्वयंपाकघरातील जिन्नसांत न सापडणारे लोणचे शोधण्यास त्याला मदत करण्यास सांगण्याच्या विनोदासारखे असंख्य हास्यतुकडे इथे तयार करण्यात आले आहेत. बिटल्सच्या साऱ्या लोकप्रिय गाण्यांचा आढावा आहेच, पण त्यांच्या ‘हे ज्यूड’ला काळानुरूप ‘हे डय़ूड’ करण्याचा गमतीशीर प्रमादही केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यात ‘जॉन लेनन’ अज्ञातवासात जिवंत असल्याचा कल्पित धागाही जोडण्यात आला आहे.

‘आमच्या काळातले संगीत’वाल्यांपासून ‘डीजेवाले बाबूं’च्या कळपात कोलाहल-आनंद अनुभवणाऱ्या सर्वच संगीतप्रेमींसाठी पर्वणी असलेला ‘यस्टर्डे’ हा वर्षांतल्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे.