बॉलिवूड गायक यो यो हनी सिंग सध्या त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलाय. हनी सिंगच्या विरोधात त्याचीच पत्नी शालिनी तलवारने कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केल्यामुळे बराच चर्चेत आलाय. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे
पत्नी शालिनी तलवारीने हनी सिंगविरुद्ध तक्रारी नोंदवल्यानंतर दिल्लीतील तीस हजारी सत्र न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला २८ ऑगस्ट पूर्वी उत्तर देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यो यो हनी सिंग आणि शालिनी यांचा विवाह २०११ रोजी दिल्लीतल्या एका गुरूद्वारामध्ये झाला होता. . शालिनीने हनी सिंगबरोबरच त्याच्या आई-वडिलांवर देखील आरोप केले आहेत.
यो यो हनी सिंग आणि शालिनी यांच्या लग्नाविषयी फार कमी लोकांना माहिती होते. यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात सक्रिय असते. गेल्या काही काळात तिने फक्त काही कोट्स शेअर केले आहेत. यात तिने संस्कारी आणि बेशिस्त सून यामधील फरक सांगताना दिसून येतेय. मात्र, या पोस्टमध्ये तिने शेअर केलेले हे कोट्स तिच्या खाजरी आयुष्याला आधारून असल्याचं कुठेच जाणवू दिलं नाही. पण तिने हे शेअर केलेले कोट्स पाहून तिच्या वैवाहिक आयुष्यात चढ-उतार सुरू असल्याचं मात्र कळून येतं.
यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी हिने २० जुलै रोजी एक पोस्ट शेअर केली आहे. “कुणी जर काही सांगत असेल तर त्याला लगेच असं कधीच म्हणू नका की तू खोटं बोलतेय…यावरून टिका करणाऱ्याचं चारित्र्य, विचार आणि प्रामाणिकपणा दिसून येतो.”
यापूर्वी पत्नी शालिनी हिने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. “ती जोपर्यंत सहन करत होती, तोपर्यंत ती संस्कारी होती…बेशिस्त तेव्हा झाली जेव्हा ती बोलु लागली.” असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
त्याआधी आणखी एक पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. “भावनिकरित्या गैरवर्तन करणे म्हणजे एखाद्याची प्रतिमा खराब करणे. तसंच त्याच्या मानसिक आणि भावनिक पातळीवर खेळणं.” असं यात लिहिण्यात आलं होतं.
यो यो हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी यांनी यावर्षीच्या जानेवारीमध्येच आपल्या लग्नाचा १० वा वाढदिवस साजरा केलाय. यावेळी दोघांनी एकत्र केक कापतानाचे फोटो देखील शेअर केले होते. तसंच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सुद्धा पती हनी सिंगसोबतचा एक फोटो देखील शेअर केला होता. त्याचबरोबर त्यांच्यातील पहिल्या किसचा फोटो सुद्धा या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर हा फोटो खूप व्हायरल झाला होता.
यो यो हनी सिंग आणि पत्नी शालिनी या दोघांची अगदी शाळेपासूनची मैत्री होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि प्रेमाचं नातं त्यांनी लग्नगाठ बांधून आणखी घट्ट केलं. मध्यंतर हनी सिंग आजारपणामुळे इंडस्ट्रीमधून दूर झाला होता. त्याच्या त्या कठीण प्रसंगात पत्नी शालिनीने मोठा आधार दिला होता.