एखाद्या ऐतिहासिक गोष्टीवर, कथेवर किंवा पात्रावर जेव्हा मालिका बनवली जाते तेव्हा त्यात प्रेक्षकांची भावनिक गुंतागुंत होणे सहाजिक असते. इतिहासाच्या पानांमधील प्रसंगांना दररोज छोटय़ा पडद्यावर उलगडताना नकळतपणे पुन्हा एकदा त्या प्रसंगांना उजाळा दिला जातो. एका प्रेक्षकाच्या नात्याने जर फक्त मालिका पाहताना हे गुंतणे जाणवत असेल, तर मालिकेमध्ये भूमिका वठवणाऱ्या कलाकारांना तर ती भूमिका दिवसातील कित्येक तास जगायची असते. सोनी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘महाराणा प्रताप’ या मालिकेत महाराणा प्रताप आणि अकबर या दोन्ही भूमिका फैजल खान आणि विशाल जेठवा ही दोघे किशोरवयीन मुले साकारत आहेत. मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त घरापासून दूर वापीसारख्या ठिकाणी राहणे, बारा-बारा तासांचे थकवणारे शूटिंग, पण यासर्वात उमगलेली नवीन मैत्री यासर्वाबाबत त्यांनी ‘वृत्तांत’कडे मन मोकळं केलं.
घाटकोपरच्या पठाण चाळीतून आलेला, स्वतच्या नृत्याच्या कौशल्याने कित्येकांची मने जिंकलेला फैजल खान मालिकेत महाराणा प्रतापची भूमिका निभावत आहे. अर्थात तो केवळ पडद्यावर ही भूमिका बजावत नाही आहे, तर प्रत्यक्ष आयुष्यातही महाराणा प्रतापच्या कार्याने, व्यक्तिमत्त्वाने आपल्यावर प्रभाव टाकला असल्याचे तो मान्य करतो. छोटेसे उदाहरणच द्यायचे झाले तर तो सांगतो, गेल्या वर्षी मी एका कार्यक्रमानिमित्त राजस्थानला गेलो होतो. तेव्हा चितोडला जाणे झाले होते. त्यावेळी मालिकेमध्ये आम्ही शम्स खान सोबतच्या युद्धाचा प्रसंग चित्रित करत होतो. मालिकेतील आपल्या किल्ल्यावरील परकियांचा झेंडा काढण्याच्या विचाराने मी इतका झपाटून गेलो होतो की आता किल्ल्यावर जावं आणि आपला झेंडा फडकवावा असे त्यावेळी मला वाटत होते. अर्थात आज इतक्या आत्मीयतेने महाराणा प्रतापबद्दल बोलणाऱ्या फैजलला मालिकेच्या आधी मात्र महाराणा प्रतापबद्दल फार कमी माहिती होती. शाळेत इतिहास विषय आपला प्रिय नव्हता हे तो मान्य करतो. पण आता त्यांची भूमिका साकारताना मात्र मी त्यांच्याविषयी पूर्ण माहिती मिळवली. ते एक महान योद्धे होते, त्यांच्या आत्मविश्वासाची, अकबर समोर कधीही पराभव न स्वीकारण्याच्या त्यांच्या वृत्तीबद्दल जेव्हा वाचले तेव्हा मला त्यांच्याबद्दल अभिमान दाटून आला होता, असे तो सांगतो. थोडक्यात आता फैजलचे आयुष्य महाराणा प्रतापने व्यापून गेले आहे.
विशालची कथा फैजलपेक्षा थोडी वेगळी होती. मुंबईच्या सधन कुटुंबातून आलेल्या विशालने अभिनय क्षेत्रातच काम करायचे असे आधीपासून ठरवले आहे. त्यादृष्टीने तो पावलेही उचलत आहे. या मालिकेसाठी त्याने अभ्यासापासून विश्रांती घेतली आहे. पण इतिहासात फैजलप्रमाणे तोही कच्चा होता. अकबरची भूमिका साकारण्यापूर्वी अकबरबद्दल त्यालाही फारशी माहिती नव्हती. अकबर एक महान राजा होता हे मला ठाऊक होतं, पण प्रताप आणि अकबर शत्रू होते हे मला माहीत नव्हतं. मला तर ते दोघं मित्र होते असे वाटत होते अशी कबुली विशाल देतो. सुरुवातीला प्रतापच्या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले, पण नंतर विशाल अकबरच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला आपल्या भावाबरोबर परत आला. तेव्हाही त्याची निवड झाली नाही, पण जुन्या अकबरला बदलायची वेळ आली तेव्हा त्याला निवडण्यात आले त्यामुळे या मालिकेतील अकबरची भूमिका आपल्यासाठी बनली होती असे आपल्याला वाटते असे तो गमतीत म्हणतो.
मालिकेच्या सुरुवातीला लांब झब्बा, सलवार घालणे, दागिने घालणे हे पण आपल्यासाठी एक आव्हान होते. आपण हे काय घालतोय असा प्रश्न पडायचा, पण आता सवय झाली आहे. उलट आता तर एखाद्या दिवशी मेकअपदादा कानातलं घालायला विसरतात तेव्हा मी त्यांना आठवण करून देतो, इतकी मला त्याची सवय झाली आहे असे फैझल सांगतो. माझ्या या लूकची गंमत मलाच नाही माझ्या मित्रांनाही येते. माझे मित्र मला आधी दागिने घालतो म्हणून चिडवायचे पण नंतर त्यांना माझे काम आवडू लागले आणि त्यांचे चिडवणे थांबले, असा फैजलचा अनुभव होता, पण दुसरीकडे विशाल मात्र अकबरची भूमिका साकारतोय म्हणून मित्रांकडून मिळणाऱ्या खास वागणुकीने गोंधळून गेलायं. ते मला मी खास असल्याची जाणीव करून देतात, पण मला त्यांचा जुना विशाल बनून राहायलाच आवडतं, असे तो म्हणतो.
  या दोघांनाही एकमेकांच्या मैत्रीने जवळ आणले आहे. आम्ही पडद्यावर शत्रूंची भूमिका साकारत असलो, तरी प्रत्यक्षात खूप चांगले मित्र आहोत. सेटवर नसलो तर आम्ही एकमेकांच्या रूममध्ये तुम्हाला भेटू. कधी मी फैजलच्या रूममध्ये असतो तर कधी तो माझ्या, असे विशाल सांगतो. तर फैजल पण विशालमध्ये त्याचे दूर गेलेले मित्र शोधण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आम्ही खूप भांडतो, उशांनी मारामारी करतो. पडद्यावर जितके कट्टर शत्रू आहोत, प्रत्यक्षात तितकेच चांगले मित्र आहोत, असे त्याचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या कामाची सुरुवात होते. घरच्यांपासून दूर कित्येक दिवस आम्ही येथे राहत असतो. त्यांची आठवण तर येतेच, पण आता ही गोष्ट जास्त मनावर घ्यायची नाही असे मी ठरवले आहे. या भूमिकेसाठी सध्या अभ्यासाला रजा दिली आहे. पण करिअरसाठी हे सारे स्वीकारावे लागते.
आम्ही दिवसाचे बारा बारा तास चित्रीकरण करत असतो. घरच्यांशी बोलणे होत नाही, भेटणे तर दूरच. कधीतरी शाळेतले मित्र, भावंडे यांची आठवण येते. मागे एकदा घरी गेलेलो तर माझ्या काही मित्रांना मिसुरडं फुटलेलं ते पाहून ‘अरेच्या, आपण पण मोठे होतोय’ याची जाणीव झाली. पण शक्यतो जास्त आठवणींमध्ये मी रमत नाही कारण त्याने घरची ओढ लागून राहते असे सांगून तो स्वतचेच सांत्वन करतो.

सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या कामाची सुरुवात होते. घरच्यांपासून दूर कित्येक दिवस आम्ही येथे राहत असतो. त्यांची आठवण तर येतेच, पण आता ही गोष्ट जास्त मनावर घ्यायची नाही असे मी ठरवले आहे. या भूमिकेसाठी सध्या अभ्यासाला रजा दिली आहे. पण करिअरसाठी हे सारे स्वीकारावे लागते.
आम्ही दिवसाचे बारा बारा तास चित्रीकरण करत असतो. घरच्यांशी बोलणे होत नाही, भेटणे तर दूरच. कधीतरी शाळेतले मित्र, भावंडे यांची आठवण येते. मागे एकदा घरी गेलेलो तर माझ्या काही मित्रांना मिसुरडं फुटलेलं ते पाहून ‘अरेच्या, आपण पण मोठे होतोय’ याची जाणीव झाली. पण शक्यतो जास्त आठवणींमध्ये मी रमत नाही कारण त्याने घरची ओढ लागून राहते असे सांगून तो स्वतचेच सांत्वन करतो.