यूटय़ूब स्टार अभिनेत्री स्टिव्ह रेयानच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे हॉलीवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. लॉस एंजेलिस पोलिसांना राहत्या घरी तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. वाऱ्यासारख्या पसरलेल्या या बातमीमुळे तिची मित्रमंडळी आणि चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. कलाकार कितीही उत्तम असला तरी त्याला आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी अपेक्षित संधी मिळतेच असे नाही. मग ही मंडळी इंटरनेटच्या माध्यमातून आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहचवतात. आणि प्रेक्षकांना ते आवडले तर ते लाइक, कॉमेंट, शेअरच्या माध्यमातून त्या कलाकृतीला दाद देतात. अभिनेत्री स्टिव्ह हीदेखील अशाच कलाकारांपैकी एक होती. इंटरनेटवर ‘स्टिव्ह टीव्ही’ या यूटय़ूब वाहिनीवरून ती आपला कार्यक्रम सादर करायची. एक विनोदी कलाकार म्हणून नावारूपाला आलेल्या स्टिव्हच्या प्रसिद्धीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत होता. मात्र अचानक आलेल्या तिच्या या आत्महत्येच्या बातमीने तिच्या चाहत्यांचाही गोंधळ उडाला आहे. तिच्या मित्रमंडळींच्या मते काही दिवसांपूर्वी तिच्या आजोबांचे निधन झाले होते आणि त्यामुळे मानसिकदृष्टय़ा ती फार खचली होती. यातून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्नही त्यांनी केले, पण ती आत्महत्या करेल असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते. तिचा प्रियकर ड्रॅक बेल यानेही आपला यावर विश्वासच बसत नाही आहे, कुणीतरी मला या वाईट स्वप्नांतून जागे करा, अशा शब्दांत आपले दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा