Ranveer Allahbadia Case in Supreme Court : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया एका मोठ्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे रणवीरवर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. रणवीरने या शोमध्ये एका सहभागी स्पर्धकाला एक आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर यावरूनच रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणी रणवीर अलाहाबादियाने माफी देखील मागितली होती. मात्र, तरी देखील त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या.

आता रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने एक धक्का दिला आहे. रणवीर अलाहाबादियाने पासपोर्टची मागणी केली होती. मात्र, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सध्या तरी रणवीर अलाहाबादियाला पासपोर्ट मिळणार नाही. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनी होणार आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

गुवाहाटी, मुंबई आणि जयपूरमध्ये रणवीर अलाहाबादियाच्या विरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अटकेपासून संरक्षण देण्याच्या अंतरिम आदेशाची मुदत न्यायालयाने वाढवली आहे. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी दोन आठवड्यात पूर्ण होईल. दरम्यान, तोपर्यंत रणवीर अलाहाबादियाला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितलं. जर पासपोर्ट आता जारी करण्याचा आदेश दिला तर तपासावर परिणाम होऊ शकतो, असं कारण न्यायालयाने सांगितलं आहे.

रणवीर अलाहाबादियाच्या विधानाने नेमकं काय वाद झाला होता?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाला. रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैनासह आदींवर पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या. शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणे आणि अश्लील चर्चा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.