विविध विषयांवर आधारित पॉडकास्टमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला रणवीर अलाहाबादिया गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. रणवीर अलाहाबादियाने ‘इंडिया गॉट लेटेंट’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने आक्षेपार्ह विधान केले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. इतकेच नाही तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रणवीर अलाहाबादियाची सर्वोच्च न्यायालयात धाव

रणवीर अलाहाबादियाने विविध राज्यांत त्याच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रणवीर अलाहाबादियाचे हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी घेणार आहे, असे भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या सायबर विभागाने रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतर काही कलाकरांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या सायबर विभागाने आयटी ॲक्टच्या अंतर्गत ही केस दाखल केली आहे. तसेच इंडिया गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड यूट्यूबवरून हटवण्यात आले आहेत. याबरोबरच, आसाम पोलिसांनी रणवीर अलाहाबादिया व आशीष चंचलानीला समन्स बजावले आहेत.

रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह टिप्पणीवर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वादही निर्माण झाला. त्यानंतर रणवीर अलाहाबादियाने एक व्हिडीओ शेअर करीत माफी मागितली होती. त्याने म्हटले होते की, ‘इंडिया गॉट लेटेंट’मध्ये मी जे वक्तव्य केले, त्याबद्दल मी माफी मागतो. जे काही झाले, त्यासाठी मी कोणतेही संदर्भ किंवा कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे, असे म्हणत त्याने माफी मागितली होती.

दरम्यान, रणवीर अलाहाबादिया हा प्रसिद्ध यूट्यूबरपैकी एक आहे. त्याच्या पॉडकास्टमध्ये बॉलीवूड सेलेब्रिटींपासून ते आध्यात्मिक गुरूंपर्यंत अनेक तज्ञ हजेरी लावताना दिसतात. प्रसिद्ध गायक बी प्राकने या वादानंतर एक व्हिडीओ शेअर करीत रणवीरच्या पॉडकास्टमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच ही आपली भारतीय संस्कृती नसल्याचे त्याने म्हटले होते.

Story img Loader