बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारतीयांच्या फार जवळच्या आहेत. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्यातली मैत्रीही फार घनिष्ट असते. काहींच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होईऊ पुढे ते विवाह बंधनात अडकतातही. याचे ताजे उदाहरण म्हणजे युवराज सिंग आणि हेजल केच. या दोघांनी ३० नोव्हेंबरला पंजाबी पद्धतीने लग्न केले. तर नंतर गोव्यात हिंदू पद्धतीनेही दुसऱ्यांदा लग्न केले. हे काही पहिल्यांदा झाले नाही की, कोणताही क्रिकेटर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. याआधी शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतौडी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या जोडप्यांची उदाहरणे आहेतच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, क्रिकेटपटू झहीर खान आणि चक दे इंडिया चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री सागरिका घाटगे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. काही महिन्यांपूर्वी युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नसोहळ्यात सागरिका आणि झहीर एकत्र बघायला मिळाले होते. मात्र या दोघांनी यावर काहीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता पहिल्यांदाच अभिनेत्री सागरिका घाटगे हिने झहीरसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत सागरिकाला झहीरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली की, ‘आता इतकेच सांगेन की मी सध्या खूप चांगल्या वातावरणात आहे. खूश आहे. मी कधीही माझ्या खासगी आयुष्यातील कोणतीही गोष्ट जाहीर केली नाही, अगदी सोशल मीडियावरदेखील काहीच शेअर केले नाही. कोणाचेही वैयक्तिक आयुष्य हे चर्चेचा विषय असू शकत नाही. झहीर खानबाबत मला खूप आदर आहे. माझा आगामी चित्रपट इरादा लवकरच प्रदर्शित होत आहे. तुम्ही विचारण्यापूर्वीच मी सांगू इच्छिते की, झहीर हा चित्रपट बघणार आहे.’

सागरिका लवकरच इरादा या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे, ती सध्या याच चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. इरादा चित्रपटात नसरुद्दीन शाह, अर्शद वारसी आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zaheer khan sagarika ghatge in happy space actor talks on her relationship