Zakir Hussain : सुप्रसिद्ध कलाकार, तबला वादक, संगीतकार, अभिनेते झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन हे अमेरिकेत वास्तव्य करत होते. त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्वही घेतलं होतं. त्यांच्या निधनामुळे भारतीय आणि जागतिक संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. झाकीर हुसैन यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात भारतीय शास्त्रीय संगीतापासूनच केली होती. मात्र आपल्या अद्वितीय शैलीमुळे झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) जागतिक स्तरावरचे प्रसिद्ध कलाकार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण होते झाकीर हुसैन?

९ मार्च १९५१ या दिवशी जन्मलेले झाकीर हुसैन यांचे वडील सुप्रसिद्ध तबला वादक अल्ला राखा खान हे होते, तर त्यांच्या आईचं नाव बावी बेगम होतं. वयाच्या सातव्या वर्षांपासून तबल्यावर त्यांची बोटं आणि हातांची थाप पडू लागली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून ते तबला वादनाचे कार्यक्रम करु लागले. वॉशिंग्टन येथील विद्यापीठात त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवीही घेतली. त्यांचे दरवर्षी साधारण १५० कार्यक्रम होत असत.

शक्ती नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना

२०१६ मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले. त्यांनी १२ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘साझ’ हा चित्रपट चर्चेत राहिला. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा उत्तम मिलाफ होऊ शकतो असा विचार झाकीर हुसैन यांनी केला. पंडित रवि शंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. १९७० मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत, “शक्ती” नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली. त्यामुळे भारतीय संगीत हे जागतिक स्तरावर पोहचलं.

झाकीर हुसैन यांना मिळालेलं पहिलं मानधन होतं ५ रुपये

झाकीर हुसैन यांना तबला वादन इतकं आवडत होतं की त्यांच्या हाती एखादं भांडं आलं तरीही त्यातून ते एखादा सूर काढून दाखवत असत. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते वडिलांसह कार्यक्रमांमध्ये तबला वादन करत होते. जेव्हा ते १२ वर्षांचे होते त्यावेळी उस्ताद अल्ला राखा खान, पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद बिस्मिल्लाह खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांना भेटले. झाकीर हुसैन यांनी १२ व्या वर्षी वडिलांसह तबला वादन केलं तेव्हा त्यांना ५ रुपये मानधन मिळालं होतं. हे पाच रुपये माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत असं झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

झाकीर हुसैन यांचा अनेक पुरस्काराने गौरव

१९८८ मध्ये झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांना पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन ( Zakir Hussain ) यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तबला नसांनसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zakir hussain death who is he and how he made tabla famous all over the world know about it scj