प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे गेल्या आठवड्यात वयाच्या ७३ वर्षी अमेरिकेत निधन झाले. आता झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्यावर सॅन फ्रान्सिस्को येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही पहिली पोस्ट आहे.
झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर कुटुंबाची पहिली पोस्ट
या पोस्टमध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, ज्यामध्ये एका तबल्यावर झाकीर हुसैन, त्यांची पत्नी अँटोनिया मिनेकोला, आणि त्यांच्या मुली अनीसा कुरेशी व इसाबेला कुरेशी यांचे हात एकमेकांत गुंफलेले दिसतात. “प्रेमात कायम एकत्र (हार्ट इमोजी)” असे कॅप्शन पोस्टला दिले आहे.
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना झाकीर हुसेन यांच्या एका चाहत्याने लिहिले, “आम्हाला मार्गदर्शन व प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या शिकवणुकींसाठी सदैव कृतज्ञ आहोत.” दुसऱ्याने लिहिले, “या अकाउंटवर पोस्ट पाहून बरं वाटलं. कृपया पोस्ट करत राहा. दिग्गज नेहमी आठवणीत राहतात.” तर एका युजरने म्हटले, “झाकीरजी, तुम्ही आमच्यातून गेलात, पण आम्ही तुम्हाला विसरणार नाही.” आणखी एका चाहत्याने लिहिले, “उस्तादजी, तुमची परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जाईल!”
झाकीर हुसैन यांचे निधन
झाकीर हुसैन यांचे गेल्या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. जगातील आघाडीचे तबला वादक म्हणून ओळखले जाणारे झाकीर यांच्यावर गेल्या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्कोच्या फर्नवूड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी शेकडो चाहत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध वादक शिवमणी आणि इतर संगीतकारांनी ड्रम वाजवून त्यांना आदरांजली दिली.
झाकीर हुसैन यांनी चार ग्रॅमी पुरस्कार मिळवले. तबला वादक उस्ताद अल्ला रखा यांचे पुत्र असलेल्या झाकीर यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.