नाटक म्हणजे चित्रपटापेक्षा कमी ‘ग्लॅमर’चे क्षेत्र, अशा पारंपरिक गैरसमजुतीला छेद देत ‘नाटय़संपदा’ आणि ‘महाराष्ट्र कला निधी’ यांनी आपल्या आगामी नाटकाच्या नावाचे अनावरण दणक्यात केले. बेळगाव सीमाप्रश्नासारख्या ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचे नाव ‘झालाच पाहिजे’ असे असून या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १ मे, महाराष्ट्र दिनी होणार आहे. षण्मुखानंद सभागृहात पहिल्यांदाच मराठी नाटकाचा प्रयोग करण्याचा मान या नाटकाला मिळणार आहे.
हिंदी चित्रपटांच्या नावाच्या अनावरण सोहळ्याच्या थाटातच या नाटकाच्या नावाचे अनावरण स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी ‘नाटय़संपदा’चे अनंत पणशीकर, नाटकाचे लेखक प्रदीप राणे, दिग्दर्शक विजय केंकरे आणि शाहीर संभाजी भगत उपस्थित होते. या नाटकात सुबोध भावे प्रमुख भूमिकेत आहे.
महाराष्टाच्य्रा स्थापनेआधीपासूनच ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ही घोषणा महाराष्ट्रात दुमदुमत आहे. मात्र सुवर्ण महोत्सवी वर्षांनंतरही बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकलेले नाही. सध्या बेळगावातील मराठी कुटुंबांची अवस्था विदारक आहे. हीच परिस्थिती आम्ही नाटकातून मांडणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाल्यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि बेळगाव वगैरे सीमावर्ती भागातही याचे प्रयोग करणार आहोत, असे पणशीकर यांनी स्पष्ट केले. सध्या या नाटकाच्या लेखनासाठी अनेक अग्रलेख, आचार्य अत्रे यांचे लेख, काही इतिहासाची पुस्तके अशा संदर्भाचा अभ्यास आपण करत आहोत, असे लेखक प्रदीप राणे यांनी सांगितले. तर, नाटकाची मांडणी वग स्वरूपाची असून त्यात आम्ही लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करू, असे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या नाटकाला अजय-अतुल या संगीतकारांच्या संगीताचा परिसस्पर्श लाभणार आहे.
‘षण्मुखानंद’च्या मंचावर १ मे रोजी ‘झालाच पाहिजे’चा शुभारंभ
नाटक म्हणजे चित्रपटापेक्षा कमी ‘ग्लॅमर’चे क्षेत्र, अशा पारंपरिक गैरसमजुतीला छेद देत ‘नाटय़संपदा’ आणि ‘महाराष्ट्र कला निधी’ यांनी आपल्या आगामी नाटकाच्या नावाचे अनावरण दणक्यात केले.
First published on: 02-02-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zalach pahije drama play on 1st may on shnmukhanand stage