गुजरातीबहुल वस्ती असलेल्या घाटकोपर येथील झवेरबेन नाटय़गृहात दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा मराठी नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. ‘कलादर्शन प्रॉडक्शन’ संस्थेने या नाटय़गृहात मराठी नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरू करण्यासाठी पाऊल उचलले आणि प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे झवेरबेन नाटय़गृहात नियमित मराठी नाटकांचे प्रयोग करण्याचा संस्थेचा मानस आहे.
झवेरबेन नाटय़गृहात मराठी नाटकांचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू करावेत, असा विचार कलादर्शन प्रॉडक्शन संस्थेचे दिनेश पोकम यांनी केला आणि गेल्या शनिवारी या नाटय़गृहात ‘दोन स्पेशल’ या नाटकाचा प्रयोग झाला. प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. झवेरबेन सभागृह/ नाटय़गृहात यापुढे अन्य मराठी निर्मात्यांनी सातत्याने मराठी नाटकांचे प्रयोग केले तर मुलुंड ते घाटकोपर या ईशान्य मुंबईच्या भागातील मराठी रसिक प्रेक्षकांना मराठी नाटके पाहण्यासाठी नाटय़गृह उपलब्ध होणार आहे. आता २८ नोव्हेंबर रोजी ‘सुयोग’च्या ‘लगीनघाई’ या नाटकाचा प्रयोग झवेरबेन नाटय़गृहात होणार आहे.
झवेरबेन नाटय़गृहात पूर्वी मराठी नाटकांचे प्रयोग होत होते, मात्र काही कारणाने सध्या येथे मराठी नाटकांचे प्रयोग होणे बंद झाले. ईशान्य मुंबई परिसरातील नाटकवेडय़ा मराठी रसिक प्रेक्षकांसाठी येथे पुन्हा मराठी नाटकांचे प्रयोग सुरू करावे या विचाराने आपण हे पाऊल उचलले. मराठी नाटय़रसिकांनी यापुढेही येथे होणाऱ्या मराठी नाटकाच्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद द्यावा, म्हणजे पुन्हा एकदा येथे सातत्याने मराठी नाटकांचे प्रयोग सुरू होतील, आसे दिनेश पोकम यांनी सांगितले.

Story img Loader