झी गौरव पुरस्कार सोहळ्याची यंदाची नामांकने एका रंगतदार कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये यावर्षी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि समीक्षकांनी गौरविलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ने १३ नामांकने मिळवत आघाडी घेतली तर ब्लॉकबस्टर हिट ठरलेल्या ‘लय भारी’ने तब्बल १२ विभागात नामांकने मिळवली. याशिवाय ‘लोकमान्य-एक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘क्लासमेट्स’नेही महत्त्वाच्या विभागांमध्ये नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे. व्यावसायिक नाटकांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित भरत जाधव अभिनित ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाला सर्वात जास्त ९ नामांकने मिळाली असून संजय खापरे अभिनित ‘कळत नकळत’ या नाटकाने ८ नामांकने मिळवली आहेत. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘ती’, ‘गोष्ट सिंपल पिलाची’ आणि ‘झोपाळा’ या नाटकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे. यावर्षी रंगणा-या झी गौरव पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटासाठी ‘चित्रगौरव’ आणि नाटकांसाठी ‘नाट्यगौरव’ असे दोन वेगवेगळे रंगतदार सोहळे होणार आहेत. यातील ‘चित्रगौरव’ येत्या १३ मार्चला तर ‘नाट्यगौरव’ २६ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. ‘आयदान’ नावाच्या नाटकाचादेखील समावेश आहे.
यावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि विद्याधर पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात संजय मोने, स्वाती चिटणीस आणि रविंद्र दिवकेर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी डॉ. अनिल बांदिवडेकर, विजय केंकरे आणि प्रदीप राणे यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा