झी मराठीवर नेहमीच विविध धाटणीच्या मालिका प्रसारित होत असतात. नुकतंच झी मराठीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सुरु झाली आहे. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली आहे. खेडेगावात राहणाऱ्या आणि जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या अप्पीला कलेक्टर व्हायचं आहे. त्यासाठी ती जीव तोडून मेहनत घेत आहे. अभ्यास करत त्यातील अडथळे पार करत कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे. या मालिकेतील एका दृष्यावर मुख्य नायक रोहित परशुरामने एक पोस्ट केली आहे.
अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा नायक रोहित परशुराम याने नुकतंच एक फायटिंग सीन शूट केला. हा सीन पृथ्वी आणि अर्जुन यांच्यात शूट करण्यात आला. यात पृथ्वीने अप्पीचा अपमान केला. त्याचा बदला अर्जुन घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा संपूर्ण चिखलात शूट करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने रोहितने काही फोटो शेअर केले आहेत. त्याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली
रोहित परशुरामची इन्स्टाग्राम पोस्ट
“रोह्या बरं आहे बाबा तुझं, मस्त शूटिंग करायची, फोटो काढायचे आणि आरामात राहायचं…”
“आम्हाला पण बघ की काय असेल तर असं सोप्प काहीतरी..”
“तुमचं काय बाबा, निवांत काम आहे तुमचं..”
“मजा आहे बाबा तुमची..”
ह्या क्षेत्रात आल्यापासून ही आणि अश्या संदर्भाची वाक्य गेल्या ४ वर्षांत मी खूप ऐकली आहेत आणि ऐकतोय.खरंच आज खूप मनापासून सांगावसं वाटतंय, ह्या क्षेत्रात पण जिवाचं रान, रक्ताचं पाणी आणि ह्याच भावकितले वाक्यप्रचार वापरून कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी खूप प्रामाणिकपणे कराव्या लागतात. प्रचंड कष्ट आणि त्याग असलेल्या ह्या क्षेत्रात दुर्दैवाने फक्त कॅमेऱ्यासमोर असलेले आम्ही so called Hero भाव खावून जातो पण त्यामागे काम करणारं संपूर्ण युनिट हे खरं HERO म्हणवून घेण्यास जास्त योग्यतेचं आहे असं माझं आता फायनल ओपिनियन झालं आहे.
ह्या fight sequence च्या shoot च्या वेळी आशुतोष बावीसकर सर जेव्हा आमच्या आधी जाऊन चिखलात उभे होते तेव्हाच कळलं की हा ध्येयवेडा माणूस आज काहीतरी अफलातून घडवून आणणार आहे ! आणि झालंही तसंच…. मराठी टीव्ही सीरियल च्या इतिहासच क्वचितच असा फाईट सीक्वेन्स शूट झाला असेल.
आम्ही फक्त चिखलात भरलो होतो पण सेट वरचा प्रत्येक व्यक्ती त्या वेळी प्रचंड दबावात संपूर्णपणे आमची काळजी घेत होता, आम्हाला काही ईजा होऊ नये ह्यासाठी धडपडत होता. ७०-८० जणांचा पूर्ण स्टाफ आम्हा दोघांकडे लक्ष देऊन होता, किती वेळा डोळ्यांत चिखल गेला तर कितीतरी वेळा कानात. दम लागत होता, क्वचित एखादा खडा हातात शिरत होता पण सेट वर आमची काळजी घेणारा प्रत्येकजण ते स्वतः अनुभवत होता. टिश्यू, पाणी, गरम पाणी, चहा, सॅनिटायझर, डेटॉल सगळं सगळं कसं तयार होतं.
सगळ्यांनी लहान बाळासारखी आमची काळजी घेतली म्हणून हा सीन एवढा इफेक्टीव्हीली शूट होऊ शकला. म्हणूनच मला वाटतं की ह्या सेट वरचा प्रत्येक जण खरा हिरो आहे.
प्रत्येक जण अर्जुन आहे ! झी मराठी आणि व्रज प्रोडक्शनचे धन्यवाद.७ तास चिखलात चाललेलं शूट, लाल झालेले डोळे, हातापायांना झालेल्या जखमा आणि राबलेले शेकडो हात फक्त तुमच्या कौतुकाच्या २ शब्दांसाठी आहेत रसिक मायबाप प्रेक्षकहो, तुम्हाला विनंती आहे की आज संध्याकाळी नक्की बघा !! अप्पी आमची कलेक्टर. संध्या. ७.००, आपल्या #zeemarathi वर !!”, असे रोहित परशुरामने म्हटले आहे.
रोहित परशुरामची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्याच्या मालिकेतील कामाबद्दल कमेंट केली आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या टीमचेही कौतुक केले आहे.