झी मराठी वाहिनीवरील अनेक कार्यक्रम हे नेहमीच लोकप्रिय ठरताना दिसतात. त्यातच आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर पडणार आहे. झी मराठीवर येत्या २९ जुलैपासून बस बाई बस या नव्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मात्र हा कार्यक्रम प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी मराठीने त्यांच्या अधिकृत युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत या कार्यक्रमाचे होस्ट सुबोध भावे यांनी सुप्रिया सुळेसोबत अनेक गंमतीजमती केल्या. यावेळी सुबोध भावेने सुप्रिया सुळेंसोबत एक खेळ खेळला. यावेळी त्यांनी त्यांना काही नेत्यांचे फोटो दाखवले. हे फोटो पाहून सुप्रिया सुळेंनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो दाखवण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “नमस्कार कसे आहात. तुम्ही कमी बोलता आणि मी फक्त बोलतच राहते. त्यादिवशी आपली उद्धवजींच्या केबिनमध्ये भेट झाली होती, तेव्हा तुम्ही मला बोलला नाहीत की आपण सुरतला निघणार. आपण किमान तिथे विधानभवनात भेटलो असतो.”

Video: …अन् सुप्रिया सुळेंनी चक्क गुजराती भाषेतून साधला पंतप्रधान मोदींशी संवाद

“आता मी घरी खूप चिडवते कारण आता पवार विरुद्ध शिंदे होणार. कारण पवार माझे वडील आणि माझ्या आईचं आडनाव शिंदे. मी परवा दादालाही सांगितलं की, दादा आता किती मजा येणार ना, कारण पवार विरुद्ध शिंदे होणार. बाबा जिंकणार की आई हे काळचं ठरवेल. आपला श्रीकांत मला खूप प्रिय आहे. श्रीकांत खूप गोड मुलगा आहे. मला आनंद वाटतो. परवा भेटला होता दिल्लीत, तुम्ही दिल्लीत आला होता, पण आपली भेटच झाली नाही.

श्रीकांतची होते. छान गोड मुलगा आहे. मला खूप प्रिय आहे. सगळीकडे आता पाऊस वैगरे पडतोय. बघा बाबा त्या चिन्हाचं वैगरे काय होतं ते उरकून टाकून जरा कामाला लागूया हो. सव्वा महिना झाला. माझ्या कामाचा इतका खोळंबा झाला आहे, एखाद्या कलेक्टरला किंवा अधिकाऱ्याला फोन केला की अधिकारी म्हणतात, अजून मंत्रीच जागेवर नाहीत. जरा तेवढं बघा. माझी मतदार संघातील फार काम अडकलीत, तेवढं फक्त लवकर करुन घ्या. खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इतकं कमी बोलता की मला दडपण येतं. मी बोलतंच राहते. आपलं नातं वन वे आहे असंच वाटतं. ओके भेटूया आपण. जय महाराष्ट्र”, असे सुप्रिया सुळेंनी यावेळी म्हटले.

बस बाई बस : “मी स्वयंपाक करण्यात कमीपणा…” चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर

दरम्यान बस बाई बस या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यावर अनेक जण विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अनेकांनी हा शो पाहायला मजा येणार, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने लय भारी अशी कमेंट केली केली आहे. सुबोध भावे याचा ‘बस बाई बस’हा कार्यक्रम येत्या २९ जुलैपासून प्रक्षेपित होणार आहे. हा कार्यक्रम खास स्त्रियांसाठी असणार आहे. यात सुबोध स्त्रियांसाठी राखीव अशी लेडीज स्पेशल बसचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi bas bai bas supriya sule talk about eknath shinde during show nrp