झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो सध्या चर्चेत आहे. या शोच्या आगामी भागामध्ये महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे, शरद पवार यांचे नातू तसेच कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी, आमदार प्रणिती शिंदे मजामस्ती करताना दिसणार आहेत. दरम्यान पंकजा मुंडे या वडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळते.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ‘किचन कल्लाकार’ या शोच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तिघेही शोचे महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांच्याशी गप्पा मारताना दिसतात. दरम्यान प्रशांत दामले पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारतात की, ‘आज जर साहेब (गोपिनाथ मुंडे) इथे असते तर ते तुम्हाला काय म्हणाले असते. त्यांच्या बद्दल काय भावना आहेत.’
आणखी वाचा : ‘बॉबी अंतर्वस्त्र न घालताच सेटवर…’, धर्मेंद्र यांनी सांगितला मजेशीर किस्सा

प्रशांत दामलेंचा प्रश्न ऐकून पंकजा मुंडेंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या उत्तर देत म्हणाल्या, ‘ते प्रचंड नर्वस झाले असते. कारण जेव्हा मी परफॉर्म करायचे किंवा भाषण करायचे तर ते नेता म्हणून बघायचे नाहीत तर पिता म्हणून फार नर्वस व्हायचे. खूप काळजी करायचे. म्हणजे जेव्हा मी परळीवरुन रात्री-बेरात्री निघायचे तेव्हा मी नगर क्रॉस करताना माझ्या मागे दोन तीन गाड्या असायच्या. त्या गाड्या माझा पाटलाग का करत आहेत? असा मला प्रश्न पडायचा. मग मी विचारल्यावर ते सांगायचे की साहेबांनी फोन केला की पंकजा ताई निघाल्या आहेत. घरापर्यंत तिला पोहोचवा. ते नेहमी नर्वस व्हायचे. आज इथे बसूनही ते नर्वस झाले असते आणि त्यांना वाटलं असतं की माझाच पदार्थ जिंकावा.’