महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या १८ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान केला आहे. झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या महामिनिस्टर या नवीन पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या पर्वाची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी या पैठणीच्या किंमतीवरुन आदेश बांदेकरांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. नुकतंच आदेश बांदेकर यांनी या ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहे.
होम मिनिस्टर हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या १८ वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आला आहे. होम मिनिस्टरमधील नवीन पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु असताना अनेक ट्रोलर्सने त्याबद्दल ट्रोलिंग सुद्धा सुरु केले आहे. त्या ट्रॉलर्सना नुकतंच एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनी खडे बोल सुनावले.
आणखी वाचा – Good News! बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी आला ‘छोटा पाहुणा’
“जवळपास ११ लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत. त्यांना कदाचित माहिती नाही आहे कि ती मी देणार नाही आहे. ती पैठणी प्रयोजकांकडून येते. झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो”, असेही ते म्हणाले.
“गेली १८ वर्ष सतत हा कार्यक्रम सुरु आहे, म्हणजेच दररोज १ पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या. त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत नाही, त्यामुळे हे ट्रोलिंग होते, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा – “मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा
“ही ११ लाखांची पैठणी येवलेमध्ये बनतेय. ही पैठणी बनवणारे कारागीर जे आहेत ते मूकबधिर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत ११ लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल. त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय. पण या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे”, असेही आदेश बांदेकर यांनी म्हटले.