टीव्ही मालिकांचा TRP जितका चांगला, तितका काळ ती मालिका सुरु राहते. पण TRP घसरला की, त्या मालिकेचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात होते. झी मराठी वाहिनीवरील बऱ्याच मालिका हळुहळु प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसून येत आहे. अशात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ आता वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यामुळं या मालिकेमध्ये पुढं काय होणार की या मालिकेला सुद्धा नारळ दिला जाणार याकडं गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही मालिका आता बंद होऊन त्याजागी नव्या मालिका होणार आहे.

झी मराठी वाहिनीने नेहमीच दर्जेदार मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. मात्र स्टार प्रवाह वाहिनीला गेल्या काही दिवसांपासून चांगला टीआरपी मिळताना दिसत आहे. झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ ही मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी या दोघांची फ्रेश जोडी देखील घराघरात सर्वांची आवडती जोडी ठरली. या मालिकेतील आदित्य आणि सई यांची हटके लव्ह स्टोरी आणि मामांचं असणारं सॉलिड कॉम्बिनेशन अशी भन्नाट कल्पना या मालिकेची होती. मालिकेचं वेगळं कथानक आणि त्यातील कलाकारांची फौज यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण देखील बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रसारित होत नव्हते. त्यासाठी दोन वेबीसोड्स देखील प्रदर्शित करण्यात आले होते.

‘माझा होशील ना’ मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये सईला सोडवण्यासाठी गेलेला आदित्य सुद्धा अडचणी सापडलेला दाखवण्यात आलंय. जेडी, मॉन्टी आणि जोशी या तिघांनी कंपनीच्या एका खोलीत सई आणि आदित्य दोघांना डांबून ठेवलेलं असतं. जेडी त्या दोघांना म्हणतो, आज मी तुमच्या दोघांचा खेळ इथेच संपवणार. या दोघांना मारण्यासाठी तिघेही दोघांना खोलीत डांबून बाहेर निघून जातात आणि खोलीत गॅस लीक करण्यासाठी सांगतात. त्यामुळे आता या मालिकेत आदित्यचे मामा दोघांचा जीव कसा वाचवतात, हे पाहणं रंजकदार असणारेय. तसंच या संकटातून दोघांची सुटका झाल्यानंतर मालिका संपणार का? तसंच संपणार असेल तर मालिकेचा शेवट काय असणार, याचा अंदाज आता प्रेक्षकवर्ग लावत आहेत.

माझा होशील ना या मालिकेच्या जागी येत्या ३० ऑगस्ट पासून ” तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” ही मालिका प्रसारित होणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच आला असून या मालिकेत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री “अमृता पवार” झळकणार आहे. सोनी मराठी वरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून अमृता पवारने जिजामातोश्रींची भूमिका साकारली होती. ‘दुहेरी’ या मालिकेतून अमृताने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ललित २०५, जिगरबाज अशा आणखी काही मालिका तिने अभिनित केल्या आहेत. मुंबई विद्यापीठातून बी कॉम ची पदवी मिळवलेल्या अमृताला सीए व्हायचं होतं आणि यातच करिअर करायचं होतं मात्र कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा तिने गाजवल्या आणि अभिनयाची ओढ तिला लागली. त्यामूळे आता झी मराठी प्रेक्षकांचं मन जिंकण्यात ती किती यशस्वी होते, हे पाहणं रंजक ठरणारेय.