छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र तरी या मालिकेतील सर्वच कलाकार आजही चर्चेत असतात. या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा धनश्री नव्या जोमाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लग्नापूर्वी लंडन ट्रिप, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी कपलची चर्चा
‘तुझ्यात जीव रंगला’मुळे धनश्रीच्या वाट्याला आलेली नकारात्मक भूमिका तिने उत्तमरित्या साकारली. बराच काळ या मालिकेमध्ये तिने काम केलं. पण त्यानंतर गरोदरपणामध्ये तिने मालिकेमधून ब्रेक घेतला. स्वतःसाठी वेळ द्यायचं तिने ठरवलं. पण आता एका मोठ्या ब्रेकनंतर झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेमध्ये ती काम करताना दिसणार आहे. धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटव्दारे मालिकेचा प्रोमो शेअर करत याबाबत माहिती दिली.
‘तू चाल पुढं’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करत धनश्रीने म्हटलं की, “तू चाल पुढं’ तुला गं सखे साथ तुझ्या आत्मविश्वासाची…गोष्ट एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची…नवी मालिका ‘तू चाल पुढं’ १५ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७. ३० वाजता.” या मालिकेमध्ये धनश्री नकारात्मक भूमिका साकारणार असल्याचं मालिकेच्या प्रोमोमधून लक्षात येतं.
आणखी वाचा – वैमानिक होण्यासाठी शरद पोंक्षे यांची लेक परदेशात रवाना, मुलगाही ‘या’ क्षेत्रात करतो काम
अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दिपा चौधरी या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसेल. मोठ्या ब्रेकनंतर उत्तम काम करायला मिळत असल्याने धनश्री फारच खूश आहे. धनश्रीने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. धनश्रीने तिच्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजन फारच वाढले होते. मात्र तिने जबरदस्त मेहनत घेत वजन कमी केले आहे.