यंदा नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे. तसेच सरकारने शेवटचे दोन दिवस गरब्यासाठी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले आहेत. गेली दोन वर्ष करोनामुळे सण समारंभ यावर निर्बंध लादण्यात आले होते. ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाक्यावरच्या देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वरात्रीमध्ये जांभळी नाका चैतन्याचे वातावरण असते, देवीच्या उत्सवामध्ये अतिशय सुंदर रोषणाई या परिसरात केली जाते. नुकतच झी मराठी वाहिनीवरील कलाकारांनी या टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतले आहे.
झी मराठी वाहिनी कायमच दर्जेदार मालिका आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. या वाहिनीवर सध्या दोन नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. ‘दार उघडं बये दार’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ यातील कलाकार सुहास परांजपे, शरद पोंक्षे, प्रणव रावराणे तितिक्षा तावडे या कलाकारांनी देवीचे दर्शन घेतले आहे. झी मराठी वाहिनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे प्रक्षेपण रोज रात्री १०.३० केलं जात.
टेंभी नाक्यावरच्या देवीचं महत्त्व –
महाराष्ट्रात काही प्रसिद्ध देवी आहेत. त्यामध्ये टेंभी नाक्याच्या देवीचा समावेश होतो. स्व. आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर देवीची स्थापना करण्यास सुरवात केली. ठाण्यातील या देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर असतो. ही देवी नवसाला पावणारी आहे. या देवीच दर्शन घ्यायला भाविक लांबून येतात. या देवीचा आगमन सोहळा भव्यदिव्य असतो. टेंभी नाक्याच्या परिसरात या उत्सवनिमित्त जत्रा भरली जाते. ठाणेकर, गोरगरीब जनतेला गरबा दांडिया खेळता यावा म्हणून स्व. आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला.
देवीच्या दर्शनासाठी कलाकार, सामान्य नागरिकांच्या बरोबरीने राजकीय व्यक्तीदेखील या देवीच्या दर्शासाठी येत असतात. स्व. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असत. स्व.आनंद दिघे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव सुरू ठेवला आहे. या उत्सवात लाखो नागरिक येऊन देवीचं दर्शन घेतात.