झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेला कार्यक्रम म्हणजे ‘बस बाई बस’. या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होतात. आतापर्यंत खासदार सुप्रिया सुळे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली. आता माजी महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

आणखी वाचा – ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच कोणाचा चेहरा समोर येतो? अमृता फडणवीस म्हणाल्या “उद्धवजी…”

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे किशोरी पेडणेकर. ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये त्या अनेक राजकीय विषयांवर देखील भाष्य करताना दिसतील. त्यांचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे राजकारणाशी निगडीत काही प्रश्न किशोरी पेडणेकर यांना विचारताना दिसत आहे. यावेळी शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी सोडून गेलेल्या आमदारांचं मन वळवावं लागेल का? असा प्रश्न सुबोध त्यांना विचारतो.

पाहा व्हिडीओ

या प्रश्नावर उत्तर देत त्या म्हणतात, “हो आमदारांचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. झाडाला जशी नवी पालवी फुटते तशी आमच्या शिवसेना पक्षालाही नव्याने पालवी फुटेल. आमचा बाळासाहेबांचा पक्ष जसा आहे आजही तसाच आहे. आम्हाला जिंकून देणारे लोक आजही आमच्याबरोबर आहेत.” त्यांच्या या उत्तरानंतर सुबोध भावे पुन्हा त्यांना एक प्रश्न विचारतात.

आणखी वाचा – अभिनेते अनुपम खेर यांनी बॉलिवूडसह आमिर खानलाही सुनावलं, म्हणाले, “आपण कलाकार विकत आहोत आणि…”

पण पक्षाला नवीन पालवी जर फुटणार असेल तर जुन्या लोकांची मन वळवावी लागतील का? असं सुबोध पुन्हा विचारतो. यावर त्या म्हणतात, “आता वळणं भरपूर झाली. मन वळवण्याच्या ते बाहेर गेले आहेत. पुन्हा ते शक्य नाही.” किशोरी पेडणेकर यांनी यावेळी राजकारणामध्ये गेले काही महिने घडलेल्या घडामोडी तसेच मुंबईचे खड्डे याबाबतही आपलं मत मांडलं.

Story img Loader