महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या १७ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या नवीन पर्वाची घोषणा झाली. महामिनिस्टर असे नाव असलेल्या या नवीन पर्वात विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. ही पैठणी कशी असणार, त्यावर कोणी नक्षीकाम केले आहे, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. नुकतंच याची उत्तर समोर आली आहेत.
झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या नवीन पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. महामिनिस्टर या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या ११ लाखांच्या पैठणीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे आदेश बांदेकर सुद्धा ही पैठणी बघण्यासाठी फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
महामिनिस्टर या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक या शहरापासून होणार आहे. येत्या ११ एप्रिलपासून संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाशिकमध्ये या महामिनिस्टरला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकमधील अनेक महिलांमधून १०० वहिनींची निवड महामिनिस्टरसाठी करण्यात आली. यावेळी अनेक वहिनींनी ११ लाखांच्या पैठणीवर धमाकेदार उखाणे देखील तयार केले होते.
ही ११ लाखांची पैठणी कशी असेल? हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे, असे आदेश बांदेकर म्हणाले. आता महामिनिस्टरमध्ये विजेत्या वहिनीला जी ११ लाखांची पैठणी भेट म्हणून देण्यात येणार आहे ती पैठणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून खरेदी केली जाणार आहे.
“मी आता नेल फाइल्स…”, ट्विंकल खन्नाने उडवली विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली
या कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याच्या पैठणी उद्योगाला बळ मिळणार आहे. त्यासोबतच या ११ लाखांच्या पैठणीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही पैठणी चक्क अपंग कारगिरांनी बनवली आहे. महाराष्ट्र महावस्त्र असलेल्या या पैठणीवर सोन्याची जर आणि हिरे असणार आहे. मात्र तरीही यावर नक्षीकाम करणारे कारागीर हे खास आणि प्रतिभावान आहेत, असेही आदेश बांदेकरांनी म्हटले.