सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा, साहाय्यक अभिनेत्री, दिग्दर्शक आणि विशेष लक्षवेधी नाटक अशा सात पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवत केदार शिंदे दिग्दर्शित ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाने ‘झी नाटय़गौरव’ पुरस्कारांवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ‘झी नाटय़गौरव’ पुरस्कारांसाठी यंदा ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘कळत नकळत’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ आणि ‘सर्किट हाऊस’ या नाटकांमध्ये चुरस होती. यात ‘ढॅण्टॅढॅण’पाठोपाठ ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाला जास्त पुरस्कार मिळाले. या सोहळ्यात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मराठीतील विशेष नाटय़कृतींचा आढावा घेत रंगलेल्या या गौरव सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना, ‘‘नाटय़लेखन हा कधीच माझा व्यवसाय नव्हता म्हणून नाटक लिहिणं हा माझ्या जगण्याचा अग्रक्रम बनला नाही. मला जगत राहण्यात प्रचंड मजा येते आणि ही मजा अनुभवतच मी नाटय़लेखन करतो,’’ असे एलकुंचवार यांनी सांगितलं. ‘‘लेखकपणाची झूल अंगावर पांघरली की जगणं बंद होतं. मग आपण केवळ अनुभव ‘शोधत’ राहतो. त्यात तांत्रिकपणा येतो आणि आपण अनुभव ‘घेणं’ विसरून जातो. अनुभवाचे एकेक झाड शोधण्याच्या नादात आपलं अरण्य हरवून जातं आणि ते हरवण्याची मला जास्त भीती वाटते, कारण एकदा का आपल्या जगण्यातलं नैसर्गिकपण हरवलं तर आपल्यातील सर्जकाची अखेर होते’’, अशा शब्दांत आपल्या भावना महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्याबरोबरच्या तसेच मुंबईतील टोपीवाला लेनच्या शाळेत रंगणाऱ्या नाटकांच्या आठवणींनाही त्यांनी या वेळी उजाळा दिला.
‘झी नाटय़गौरव’चा सवरेत्कृष्ट नाटकाचा मान ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाला मिळाला. याच नाटकासाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मंगेश कदम, सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लीना भागवत यांना आणि सवरेत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार मिहीर राजदा यांना मिळाला. केदार शिंदे दिग्दर्शित, भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेले ‘ढॅण्टॅढॅण’ हे नाटक विशेष लक्षवेधी नाटक ठरले, तर याच नाटकासाठी सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार केदार शिंदे यांना मिळाला. ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ या नाटकासाठी सवरेत्कृष्ट पाश्र्वसंगीताचा पुरस्कार गंधार संगोराम यांना देण्यात आला. अभिनेत्री स्पृहा जोशी हिला ‘बेस्ट परफॉर्मर ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
प्रायोगिक नाटकांमध्ये ‘एक बाकी एकाकी’ या नाटकाला सवरेत्कृष्ट नाटकाचा मान मिळाला. याच नाटकासाठी सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार संकेत तांडेल, पराग ओझा, प्रल्हाद कुडतरकर आणि महेश केसकर यांना देण्यात आला. ‘तीचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकासाठी राजन जोशी यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘आयदान’ या नाटकासाठी नंदिता धुरी, शिल्पा साने आणि शुभांगी सावरकर यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा ५ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.

Story img Loader