‘झिम्मा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे एकंदरीतच प्रेक्षकांच्या मनात या नव्या चित्रपटाविषयीची उत्सुकता होती. आता ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. येत्या २४ नोव्हेंबरला ‘झिम्मा २’ प्रदर्शित होतो आहे. यानिमित्ताने पहिल्या चित्रपटाला मिळालेलं यश, दुसऱ्या भागाच्या कथेचा जन्म आणि पुन्हा त्याच कलाकारांना एकत्र आणत घडवलेला नवा चित्रप्रवास याविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांच्याबरोबर चित्रपटातील सुपरहिट कलाकारांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत गप्पा मारल्या..
‘झिम्मा २’मध्ये पुन्हा एकदा सगळय़ा बायकांची फौज दोन वर्षांनंतर इंदू आजीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एकत्र आली आहे. पुन्हा एकदा या सगळय़ाजणी नव्या सफरीवर निघाल्या आहेत. इंदू आजीचा वाढदिवस कसा व कुठे साजरा करायचा याची संपूर्ण जबाबदारी कबीरवर असणार आहे. दोन वर्षांनंतर एकत्र परदेशी निघालेल्या या बायका काय धम्माल करणार आणि किती गोंधळ घालणार हे लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या ‘झिम्मा २’ मध्ये अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांबरोबर रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन नव्या अभिनेत्री देखील गोंधळ घालण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. पहिल्या भागानंतर दुसरा भाग बनवणं हे खचितच सोपं नसतं, तरी दुसऱ्या भागाचा विचार कसा मनात आला, याविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा >>>Video : ‘झिम्मा २’च्या ‘मराठी पोरी’ गाण्याची कमाल; कॅनडात -२°C तापमानात साडी नेसून तरुणीचा भन्नाट डान्स
या चित्रपटाच्या यशानिमित्त झालेल्या पार्टीच्या दिवशीच या चित्रपटातील सर्व अभिनेत्रींनी उत्साहाच्या भरात दुसरा भागही प्रदर्शित होणार अशा घोषणा केल्या. त्यापूर्वी खरंतर माझ्या आणि क्षितीच्या मनात या चित्रपटाचा दुसरा भाग करूया असा कुठलाच विचार नव्हता. त्याचं एक कारण म्हणजे आम्हाला ओढून ताणून या चित्रपटाचा दुसरा भाग करायचा नव्हता. मग एक दिवस सहज गप्पा मारताना विषय निघाला की दोन वर्षांनंतर या चित्रपटातील पात्रं काय करत असतील? कबीरची कंपनी आता पुढे गेली असेल. बाकीच्या बायका त्यांच्या कामात, संसारात रमल्या असतील. असा विचार करता करता हळूहळू एक गोष्ट तयार होत गेली, असं हेमंतने सांगितलं. चित्रपटाच्या कथेविषयी बोलताना, ‘विनोदी कथा आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात सुरू असलेल्या वेगवेगळय़ा क्षणांची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला स्वत:च्या आयुष्याबद्दल छान वाटावं अशा पद्धतीने त्याची मांडणी करण्यात आली आहे. आयुष्यातील आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा चित्रपट आहे असं प्रेक्षकांना वाटावं, हीच आमची हा चित्रपट करण्यामागची मुख्य भावना होती’ असं त्याने स्पष्ट केलं.
या चित्रपटात दोन नव्या पात्रांचा आणि त्या अनुषंगाने दोन नवीन अभिनेत्रींचा समावेश झाला आहे. त्याबद्दल बोलताना हेमंत म्हणाला, नव्या चित्रपटाची कथाही आधीच्या चित्रपटातील मुख्य पात्रांभोवतीच फिरते, त्यामुळे पूर्णपणे नवीन पात्र न आणता त्यांच्याच नात्यात असलेल्या दोन पात्रांचा कथेत समावेश करण्यात आला. यामध्ये निर्मिती सावंत साकारत असलेल्या निर्मला कोंडे पाटील यांच्या सुनेची गोष्ट आहे. आता निर्मला ग्रामीण सोलापूर भागातली आहे. त्यामुळे तिच्या सुनेसाठी तसाच ग्रामीण बाज असलेली अभिनेत्री सून आम्ही रिंकू राजगुरूची निवड केली. तर आधी सुचित्रा बांदेकरची मुलगी चित्रपटात होती. आता तिच्या भाचीचा समावेश झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. तिची भाचीही स्वभावाने तिच्याच सारखी असेल तर चित्रपटात अजून गंमत येईल या विचाराने शिवानी सुर्वेची निवड करण्यात आली. त्यामुळे रिंकू आणि शिवानी असे दोन नवे चेहरे या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचं हेमंत यांनी स्पष्ट केलं.
या चित्रपटातील कबीर या आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने हेमंत आणि क्षितीबरोबरच्या मैत्रीचाही उल्लेख केला. ‘खरंतर झिम्मा चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच या सगळय़ांबरोबर काम केलं आहे. अनेक वर्षांची मैत्री असूनही हेमंत आणि क्षितीसोबत मी पहिल्यांदा काम केलं. त्यामुळे अगदी घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे मी या चित्रपटात काम केलं. ‘झिम्मा’मध्ये कबीर या सगळय़ाजणींना घेऊन ट्रिपवर आला होता, पण ‘झिम्मा – २’ मध्ये तो आता त्याच्या या मैत्रिणींसोबत ट्रिपवर आला आहे. त्यामुळे पहिल्या ‘झिम्मा’मध्ये त्याची झालेली चिडचिड, त्याचं वैतागणं यापलीकडचा आनंदात असलेला, काहीसा बदललेला कबीर या चित्रपटात पाहायला मिळेल, असं सिद्धार्थने सांगितलं.
या चित्रपटातील पात्राबद्दल आणि स्त्रियांवर आधारित चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री सुहास जोशी म्हणाल्या, हेमंत आणि क्षितीसोबत मी एक नाटक केलं होतं. तेव्हापासून आमची ओळख होती. मला या चित्रपटाबद्दल जेव्हा या दोघांनी सांगितलं तेव्हा मी त्यांना अरे पण माझं वय.. असं विचारलं. तेव्हा हेमंतने तुझ्याच वयाचं पात्र आहे, असं सांगितलं. तेव्हापासून मी या चित्रपटासाठी उत्सुक होते. आता ‘झिम्मा २’ प्रदर्शित होणार आहे तर आनंद आणखी वाढला आहे. सात बायकांना एकत्र घेऊन काम करणं हे गंमतीशीर होतं, पण पूर्वीपासून ते सध्याच्या काळापर्यंत स्त्री पात्र विरहित अशी नाटकं आणि चित्रपट हे खूप क्वचित पहायला मिळाले आहेत. परंतु काही चित्रपट असे आहेत जे पुरुष विरहित आहेत आणि खूप गाजलेले आहेत, असं सुहास जोशी यांनी सांगितलं. एकूणच ‘झिम्मा’वर प्रेक्षकांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षांव झाला तसंच ‘झिम्मा २’लाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली.