झोमॅटो हे त्यांच्या वेगवेगळ्या कल्पक जाहिरातींमुळे कायम चर्चेत असतं, बऱ्याचदा ते यामुळे वादातही अडकतात. अशाच एका नव्या जाहिरातीमुळे सध्या ते अडचणीत सापडले आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ चित्रपटातील ‘कचरा’ हे पात्र साकारणाऱ्या आदित्य लाखियाला घेऊन झोमॅटोने एक नवी जाहिरात समोर आणली. या जाहिरातीमुळे लोक प्रचंड नाराज झाले. लोकांनी ही जाहिरात अमानवीय असल्याचं म्हणत याचा विरोध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लगान’मध्ये कचरा हे पात्र दलित समाजातील दाखवलं असल्याने त्याला अत्यंत वाईट अशी वागणूक गावात मिळत असते, पण अखेरीस आमिर खान त्याला आपल्याबरोबर टीममध्ये घेतो आणि त्याच्या मदतीने तो ब्रिटीशांविरुद्धचा सामना जिंकतो. हीच संकल्पना आणि ‘कचरा’ बनलेल्या आदित्यला घेऊन झोमॅटोने ‘कचरा रीसायकलिंग’ यावर एक जाहिरात सादर केली. ज्यात आदित्य लाखियाला अक्षरशः कचरा म्हणून सादर करण्यात आलं. आदित्यला जाहिरातील टेबलवर पडलेला कचरा, एखादा टॉवेल, एखादा टेबल लॅम्प अशा रूपात दाखवण्यात आलं आहे.

आणखी वाचा : ‘#4Log’ ही भानगड नेमकी आहे तरी काय? सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे ‘हे’ मीम्स पाहिलेत का?

या जाहिरातीतून कचरा रिसायकल केल्याने त्याचा पुन्हा योग्य पद्धतीने वापर करता येऊ शकतो हेच झोमॅटोला यातून दर्शवायचे होते, पण ‘लगान’मध्ये कचरा हा एक दलित समाजातील व्यक्ती दाखवल्याने ते आता अडचणीत आले आहेत. सोशल मीडियावर लोकांनी या जाहिरातीचा चांगलाच विरोध करायला सुरुवात केली आहे.

‘मसान’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घाइवान यांनीही याबद्दल ट्वीट करत झोमॅटोच्या या जाहिरातीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’वरही टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “लगानमधील कचरा हे पात्र चित्रपटांत दाखवलेल्या दलित पात्रांपैकी सर्वात अमानवीय असं पात्र होतं. झोमॅटोने हेच पात्र वापरून एक अपमानजनक आणि जातीयवादी जाहिरात तयार केली आहे. त्यांना या गोष्टीचं गांभीर्य ठाऊक आहे का? अतिशय असंवेदनशील.”

लोकांचा वाढता विरोध पाहता झोमॅटोने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर जाहीर माफि मागितली असून ती जाहिरातही काढण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित केलेली ही जाहिरात कोणाच्याही भावना दुखवण्याच्या हेतूने केलेली नसल्याचंही त्यांनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato new advertisement with lagaan starrer actor aditya lakhia aka kachra controversy avn